उद्योजकांची कायम नाराजी राहिलेल्या करविषयाला हात घालताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यातील सुधारणांचे सूतोवाच केले. कर रचना ही उद्योगांसाठी माफक व योग्य असायला हवी, याविषयी कोणाचेही दुमत राहणार नाही, असे नमूद करून सिन्हा यांनी भारतातील कर रचनेत आमूलाग्र बदल होणार असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाबरोबर याबाबतची आखणी  सुरू असून लवकरच त्याचे चित्र स्पष्ट होईल. केंद्रीय अर्थसंकल्पात त्याबाबतची रूपरेषा ठरविली जाण्याचे संकेत देत सिन्हा यांनी भविष्यातील देशाची कर रचना ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम अशी कर व्यवस्था असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.