संरक्षण मंत्रालयाने महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाटा पॉवर (एसईडी) आणि लार्सन अँड टुब्रो या अग्रणी कंपन्यांच्या संघाला मंजुरी दिल्याचे पडसाद म्हणून दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी शुक्रवारी बाजारात मोठी मुसंडी घेतली. युद्धभूमी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासाठी या कंपन्यांची निवड करण्यात आली असून, विविध टप्प्यांमध्ये राबविण्यात येणारा हा एकूण सुमारे ५०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. लार्सन अँड टुब्रो आणि टाटा पॉवर या दोन्ही सेन्सेक्समध्ये सामील ३० कंपन्यांच्या समुच्चयातील कंपन्या असून, शुक्रवारी सेन्सेक्सच्या ५०० अंशांच्या मुसंडीत यांचेच सर्वाधिक योगदान राहिले.
सेन्सेक्समधील सर्वाधिक वधारलेला टाटा पॉवरचा समभाग ५.४३ टक्क्य़ांची कमाई करून ८७.३० रुपयांवर बंद झाला, तर लार्सनचा समभाग गुरुवारच्या तुलनेत ४.६७ टक्क्य़ांची (७८.५० रु.) कमाई करून १,७५८.५५ वर स्थिरावला.