कोटय़वधींचे करार-मदार, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

‘औद्योगिक सिंहा’ची अनेक रंगसंगती, २० फुटी भव्य सभागृहे, देश तसेच क्षेत्रनिहाय दालने हे मध्य उपनगरातील अवाढव्य मैदानावरील चित्र, तर गेट वे, गिरगाव चौपाटीवरील सांस्कृतिक, दिव्यांच्या रोषणाई असे सारे येत्या शनिवारपासून देशाच्या राजधानीत आकार घेईल. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्राचा ‘मेक इन इंडिया’ सप्ताह हा प्रयत्न नरेंद्र मोदी सार्थ ठरविणार आहेत.

केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी हे शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी वरळी येथून करणार आहेत. तर सप्ताहानिमित्ताने प्रत्यक्ष बैठका, चर्चासत्रे आदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावरील २.२० लाख चौरस मीटर जागेवर होईल.

विविध २७ भव्य सभागृहे उभारण्यात आली आहेत, तर गेट वेवर नौदल संचलन, गिरगाव चौपाटी येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये भाजप खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांचे नृत्य, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे कवितावाचन आदींचाही समावेश आहे. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने नावीन्यतेला चालना आणि नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्वालकॉम’तर्फे घेतले जाणाऱ्या स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

शनिवारपासून राजधानीत सुरू होणाऱ्या भव्य ‘मेक इन इंडिया’ सप्ताह समारंभाची माहिती देण्यासाठी समारंभस्थळीच आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत, संयुक्त सचिव अतुल चतुर्वेदी, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

डिसेंबर २०१४ मध्ये मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची प्रसार मोहीम हाती घेतली होती. देशात पूरक व्यावसायिक वातावरण असल्याचेच सप्ताह कार्यक्रम प्रदर्शन आहे. विविध देश तसेच भारतातील राज्ये यांचे कंपन्यांबरोबरचे करार यावेळी होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग क्षेत्रातील शेजारचा चीन या सप्ताहात भाग घेत नसून, भारतातील रतन टाटा, मुकेश अंबानी आदी सहभाग नोंदवतील.

सर्वसमावेशक मोहीम – सीतारामन

‘मेक इन इंडिया’ सप्ताह ही मोहीम देशातील गुंतवणूकपूरक वातावरणाची ग्वाही देईल तसेच देशातील सर्व घटक, प्रदेशांना सामावून घेईल, असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. तमाम ब्रिक्स देश तसेच समस्त जागतिक अर्थव्यवस्था ढळली असताना वार्षिक ७ टक्क्य़ांवरील विकास दर राखणाऱ्या भारताकरिता नवी मोहीम ही संधी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जागतिक स्तरावरील थेट विदेशी गुंतवणूक ही उणे १६ टक्के असताना भारतातील थेट विदेशी गुंतवणूक मात्र ३८ टक्क्य़ांनी वाढल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

काय           मेक इन इंडिया सप्ताह

कधी           १३ ते १८ फेब्रुवारी २०१६

कुठे           वांद्रे-कुर्ला संकुलाचे मैदान, मुंबई

 

देश           ५२

राज्ये          १७

मुख्यमंत्री       १२

केंद्रीय मंत्री      १३

 

विदेशी पंतप्रधान,

अध्यक्ष         १८

क्षेत्र           ११

कंपन्या        १९२

शिष्टमंडळ      ५,०००

बैठक          २,५००

उद्योजक              ८,०००

 

 

‘मेक इन इंडिया’ सप्ताह हा उद्योगाविषयीच्या प्रदर्शनाचा उत्कृष्ट नमुना असेल. व्यवसायपूरक वातावरण हे त्याचे गमक आहे. उद्योग वाढीतील अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी सीआयआय ही उद्योग संघटना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग यांच्या बरोबरीने कार्य करेल.

– संजय किलरेस्कर, अध्यक्ष, सीआयआय पश्चिम क्षेत्र व अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, किलरेस्कर समूह.