अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर २०१३ हे वर्ष मुंबईकरांसाठी मेट्रो रेल्वे आणि मोनोरेलचे वर्ष ठरणार अशी आशा होती. पण दरवर्षीप्रमाणे ते आश्वासन हवेतच विरले. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था तशीच जुनाट राहिली. खासगी वाहनधारकांसाठी मात्र दक्षिण मुंबई आणि चेंबूर दरम्यानचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प आणि पावसाळय़ातील पश्चिम उपनगरांतील वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या मिलन सबवे येथील उड्डाणपूल असे दोन प्रकल्प सुरू झाले हीच काय ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
* मोनोरेल – चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौका या २० किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा ऑगस्ट २०१३ मध्ये वाहतुकीसाठी सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बसमधून खड्डेमय रस्त्यांवरून पाऊण तासाचा प्रवास करण्याऐवजी मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल, असे स्वप्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दाखवले. पण ऑगस्ट सोडा २०१३ संपत आले तेव्हा पुन्हा एकदा नवीन वर्षांचे आश्वासन दिले जात आहे. जानेवारी अखेर वा फ्रेब्रुवारीपर्यंत मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.
* मेट्रो रेल्वे – वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रो रेल्वेही २०१३ मध्ये सुरू करण्याचे वचन देण्यात आले. अर्थात त्याचे बांधकामच २०१३ च्या आरंभी पूर्ण झालेले नसल्याने मेट्रोच्या प्रवासाच्या निव्वळ भूलथापा असल्याचा अंदाज होताच. झालेही तसेच. कशीबशी चाचणी सुरू झाली. स्थानके तयार झाली आहेत. बाकी मेट्रोला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. मेट्रो नेमकी कधी सुरू होणार याचा अधिकृत मुहूर्त सांगण्याचे धाडस ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’नेही अजून दाखवलेले नाही. पुन्हा एकदा २०१४ चे आश्वासन देऊन वेळ मारून नेली जात आहे. मेट्रो व मोनोच्या निमित्ताने सार्वजनिक वाहतुकीचा नवीन अध्याय मुंबई शहरात सुरू होण्याची आशा आहे.
अर्धवट पूर्व मुक्त मार्ग आणि मिलन सबवे उड्डाणपुलाचेच समाधान!
खासगी वाहनधारकांसाठी मात्र २०१३ या वर्षांने पूर्व मुक्त मार्ग आणि मिलन सबवे येथील उड्डाणपुलाची भेट दिली. ऑरेंज गेट ते आणिक व आणिक ते पांजरापोळ असा एकूण १४.५ किलोमीटर लांबीचा प्रमुख टप्पा यावर्षी सुरू झाला. त्यामुळे मुंबईतून आणिकपर्यंत उन्नत मार्गाने व नंतर आणिक ते पांजरापोळ दरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राच्या डोंगरात बांधण्यात आलेल्या ५०० मीटर लांबीच्या भुयारी रस्त्याने वाहनचालक सुसाट प्रवासाचा आनंद घेत आहेत. मुंबईहून नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या वाहनांचा वेळ आणि इंधनात बचत झाली आहे. आता पांजरापोळ ते घाटकोपर या २.५ किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे काम व्हायला थोडा वेळ लागणार आहे. मिलन सबवे येथील उड्डाणपुलाचे काम मात्र ठरल्याप्रमाणे पूर्ण करत पावसाळा सुरू होण्याआधीच तो प्रवाशांसाठी खुला झाला. त्यामुळे दरवर्षी पावसाळय़ात पाणी साठल्याने मिलन सबवे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास यावर्षीपासून इतिहासजमा झाला आहे.