सरकार पातळीवरून चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर जाहीर होण्यास दिवसाचा अवधी असतानाच ‘मूडीज’ या आघाडीच्या पतमानांकन संस्थेने मात्र त्याबाबत अधिक आशावाद व्यक्त केला आहे. या कालावधीत हा दर वर्षभरापूर्वीच्या ४.८ टक्क्यांच्या तुलनेत अधिक, ५.३ टक्के रहील, असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास पहिल्या तिमाहीपेक्षा मात्र हा दर कमी असेल.
गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांत ४.७ टक्के हा दशकातील सर्वात कमी विकास दर भारताने नोंदविला आहे. तर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत तो ५.७ टक्के असा समाधानकारक राहिला आहे. दुसऱ्या तिमाहीबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. त्यात हा दर ५.३ टक्के असेल, असे ‘मूडीज’ला वाटते.
जुलै ते सप्टेंबर २०१३ मध्ये हा दर ४.८ टक्केच राहिला आहे. मात्र आश्वासक वातावरणाच्या जोरावर यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत तो वाढेल, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. गेल्या सलग दोन आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ५ टक्क्यांच्या खालीच राहिला आहे.
यंदाच्या मेममध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका व त्यानंतर निर्विवाद सत्तेवर आलेले नवे सरकार यामुळे एकूणच व्यवसाय तसेच गुंतवणूकपूरक वातावरण तयार झाल्याचे पतसंस्थेने म्हटले आहे. हे वातावरण प्रत्यक्षात उतरण्यास काही काळ जावा लागणार असला तरी त्याची सुरुवात झाली आहे, असेही या पतसंस्थेला वाटते.
२०१३ च्या मध्यापर्यंत आर्थिक विकास स्थिर राहिल्यानंतर त्यात सुधारणा दिसू लागली असल्याचे मत व्यक्त करत पतसंस्थेने, वित्तीय स्थान व विदेशी व्यवहार उंचावण्याच्या दिशेने सरकार पावले टाकत असल्याने अर्थव्यवस्था विकासाबाबत केले आहे. भांडवली वस्तूंचे उत्पादन सध्या संथ वाटत असले तरी ते खूपसे सकारात्मक आहे, असे मत व्यक्त करत ‘मूडीज’ने दुसऱ्या तिमाहीत कंपनी स्तरावर गुंतवणूक हा मुख्य मुद्दा राहील, असे म्हटले आहे.