गुंतवणूक खात्यांत १५.३१ लाखांची वाढ

किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड प्रकारातील गुंतवणुकीला वाढता प्रतिसाद दिल्याने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत गुंतवणूकदार खात्यांची संख्या लक्षणीय  वाढली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१६ दरम्यान गुंतवणूकदार खाती १५.३१ लाखांनी वाढून ३,७५,५६,२३५ झाली आहेत.

वर्षभरापूर्वी याच कालावधीत (एप्रिल ते सप्टेंबर २०१५) एकूण फंड खाती ३,६०,२५,०६२ होती. तर २०१५-१६ या एकूण आर्थिक वर्षांत फंड खाती ४३ लाखांहून अधिक वाढली आहेत. यापूर्वीच्या वित्त वर्षांत त्यांची संख्या २५ लाखांनी वाढली होती. गेल्या दोन वर्षांत महानगरांव्यतिरिक्त अन्य शहरातील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांकडील ओघ वाढत आहे.९

देशात विविध ४२ म्युच्युअल फंड घराणी आहेत. त्यांच्या हजारो गुंतवणूक योजना आहेत. समभाग निगडित म्युच्युअल फंडांतील निधी एप्रिल ते सप्टेंबर २०१६ दरम्यान २२,२३३ कोटी रुपयांनी वाढला आहे. पहिल्या अर्ध वित्त वर्षांत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६.७० टक्क्यांनी वाढला आहे.

सप्टेंबर २०१६ अखेर म्युच्युअल फंडांची मालमत्ता ४.३३ लाख कोटी रुपयेपर्यंत पोहोचली आहे. म्युच्युअल फंडातील एसआयपी (नियोजनबद्ध गुंतवणूक योजना) या प्रकाराला किरकोळ गुंतवणूकदारांनी अधिक प्रतिसाद दिल्याने समभाग निगडित फंड योजनांमधील ओघ वाढत असल्याचे बजाज कॅपिटलचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक अनिल चोप्रा यांनी म्हटले आहे.