सकारात्मक अर्थनिदर्शकांचे बाजारात स्वागत

वाढलेला औद्योगिक उत्पादन दर, घसरती महागाई, डॉलरच्या तुलनेत भक्कम होणारा रुपया तसेच टीसीएसमार्फत तिमाही वित्तीय निकाल हंगामाची वाढीव नफ्याने सुरुवात अशा अनेक सकारात्मक घडामोडींची दखल भांडवली बाजाराने सप्ताहअखेरच्या व्यवहारात घेतली. यामुळे १० हजारांपुढे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाला त्याचा ऐतिहासिक टप्पा गाठता आला. तर सेन्सेक्सने दोन महिन्यांच्या वरच्या स्तराला सहज स्पर्श केला.

७१.०५ अंश वाढीसह निफ्टी १०,१६७.४५ या ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाला. ०.७० टक्के वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने १८ सप्टेंबरचा १०,१५३.१० या विक्रमी कळसालाही मागे टाकले. आठवडय़ाच्या अखेरच्या सत्रात निफ्टी १०,१९१.९० पर्यंत झेपावला होता.

बाजार भांडवलाबाबत अग्रेसर असलेल्या प्रमुख ३० कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समध्ये शुक्रवारी एकाच सत्रात २५०.४७ अंश भर पडली. परिणामी मुंबई निर्देशांक ३२,४३२.६९ वर पोहोचला. २ ऑगस्टनंतरचा त्याचा हा सर्वोच्च टप्पा ठरला. गुरुवारी सेन्सेक्समध्ये ३४८ अशी गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक सत्रभर पडली होती.

ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन दर गेल्या नऊ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. तर सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली विसावला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या या दोन्ही घडामोडींचे गुंतवणूकदारांनी शुक्रवारी बाजारात खरेदीचे व्यवहार करत स्वागत केले. यामुळे मुंबई शेअर बाजाराचे भांडवल १३८.१९ लाख कोटी रुपयांवर गेले.

सेन्सेक्समध्ये अर्थातच भारती एअरटेल सर्वाधिक, ७.८९ टक्के वाढीसह तेजीमध्ये आघाडीवर राहिला. त्याचबरोबर टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार तब्बल ५.२७ टक्क्यांसह वाढले. पाठोपाठ बँक, पोलाद आदीही वाढले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकांनी ०.२० टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविली.

प्रमुख निर्देशांकांनी सलग दुसऱ्या आठवडय़ात तेजीची कामगिरी बजाविली आहे. या सप्ताहादरम्यान सेन्सेक्समध्ये ६१८.४७ तर निफ्टी १८७.७५ अंश वाढ झाली आहे. १४ जुलैनंतरची प्रमुख निर्देशांकांची ही सर्वोत्तम सप्ताहझेप राहिली आहे.

येत्या आठवडय़ात नव्या संवत्सरासाठीच्या मुहूर्ताच्या सौद्याचे व्यवहार होणार आहेत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात पहिले तीन दिवसच व्यवहार होणार आहेत.