देशांतर्गत उत्पादनानंतर किंमत कपातीचा निर्णय

देशातील जवळपास सर्वच वाहन निर्मात्यांनी वर्षांरंभी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ केली असताना, जपानची वाहन निर्माता कंपनी निस्सान तिच्या मध्यम श्रेणीतील कार ‘सनी’ची किमत १.९९ लाख रुपयांनी कमी करीत असल्याची घोषणा गुरुवारी केली. आजवर या कारसाठी आयात होत असलेल्या अनेक सुटय़ा भागांचा स्थानिक स्तरावरून पुरवठा मिळविल्याने किमतीत कपात केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

निस्सान मोटर इंडिया प्रा. लि.ने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीप्रमाणे, सनीची दिल्लीतील शोरूम्समधील किंमत ८.९९ लाख रुपयांवरून कमी करून सरसकट ६.९९ लाख रुपये अशी ताबडतोब लागू केली जाईल.  पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारात उपलब्ध सनीच्या किमतीत एकंदरीत ९४,००० रुपयांपासून ते १.९९ लाख रुपयांपर्यंत घट केली गेली आहे.

गेल्या वर्षी निस्सानने आपल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रणाली असलेली हॅचबॅक मायक्राच्या भारतीय बाजारातील किंमत ५४,२५२ रुपयांनी कमी केली होती.

कारच्या स्थानिक स्तरावर उत्पादन सुरू करणे हे खर्चात बचतीस उपयुक्त ठरले आहे, अशी प्रतिक्रिया निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण मल्होत्रा यांनी व्यक्त केली. खर्चातील या बचतीचा थेट ग्राहकांना लाभ मिळवून किमती स्पर्धात्मक पातळीवर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.