आर्थिक वर्षांत कर भरणा करण्याचे शेवटचे दिवस पाहता देशभरातील बँकांचे व्यवहार शनिवारपासून सलग तीन दिवस पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. कर्मचारी भरती आणि वेतन भत्त्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे संप-आंदोलन सुरू असल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियामध्ये मात्र केवळ रविवार व सोमवारीच व्यवहार होऊ शकणार आहेत. एरव्ही अर्धवेळ कामकाज चालणाऱ्या शनिवारी पूर्णवेळ, तर सुटीच्या रविवारच्या दिवशीही पूर्णवेळ बँका सुरू राहतील. ३१ मार्च रोजी ताळेबंदासाठी बँकांचे व्यवहार बंद असतात, मात्र यंदा कर भरणा व्हावा यासाठी सोमवारी पूर्णवेळ ग्राहक, खातेदारांसाठी बँकांच्या सर्व शाखांमध्ये व्यवहार सुरू राहतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.
तथापि बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची हाक दिली असल्याने, शुक्रवारपासूनच येथील व्यवहार ठप्प पडले. कर्मचारी भरती तसेच वेतन भत्ता वाढीसाठी शनिवारीही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू राहिल, असे ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ने स्पष्ट केले आहे. बँकेच्या देशभरात ४,८०० हून अधिक शाखा व २६ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत.