सरलेले आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये २५ कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अतिश्रीमतांचे प्रमाण आधीच्या वर्षांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी उंचावले असून त्यांची संख्या १.१७ लाखांवर गेली आहे. जमेची बाब हीच की, आपल्या उत्पन्नातील काही वाटा सामाजिक दायित्वापोटी खर्च करण्याची तयारी यापैकी ६० टक्के श्रीमंतांनी दाखविली आहे.
‘कोटक वेल्थ मॅनजेमेंट’ या कंपनीने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण येत्या तीन वर्षांत तिप्पट होणार आहे. वर्षांला २५ कोटींहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांची संख्या २०१७ मध्ये ३.४३ लाख होणार आहे.
भविष्यातही अशा श्रीमंत व्यक्तींचे उत्पन्न वार्षिक ३४ टक्क्यांनी वाढणार असून येत्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ४०८ लाख कोटी रुपये होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत श्रीमंतांची संपत्ती १०४ लाख कोटी रुपये राहिली आहे.कोटकने फीडबॅक कन्सल्टन्सी आणि अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग यांच्या सहकार्याने फेब्रुवारी ते एप्रिल २०१४ मध्ये १५० श्रीमंतांच्या संपत्तीच्या आधारावर हे सर्वेक्षण केले. ते बुधवारी मुंबईत कोटक महिंद्र बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक सी. जयरामन यांनी जाहीर केले.
जयरामन या वेळी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत श्रीमंत व्यक्ती भांडवली बाजाराकडे पुन्हा वळू लागल्या आहेत. गुंतवणूकदारांचा यापूर्वी स्थिर उत्पन्न देणाऱ्या पर्यायाकडे कल असे; मात्र २०१३ मध्ये समभागामधील गुंतवणूक ३८ टक्क्यांनी त्यांनी वाढविली.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण श्रीमंतांपैकी २६ टक्क्यांनी खासगी कंपन्यांच्या समभागांमध्ये, ५३ टक्के श्रीमंतांनी स्थावर मालमत्ता कंपन्यांमध्ये तसेच ४३ टक्के अति उच्च उत्पन्नधारकांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मनीषा व्यक्त केली आहे.