वाढत्या स्मार्टफोनमुळे ई-कॉमर्स व्यासपीठाला मिळालेली गती हेरून देशातील आघाडीच्या स्टेट बँकेनेही या क्षेत्रातील आघाडीच्या खेळाडूंबरोबर भागीदारीचे पाऊल उचलले आहे. स्टेट बँकेने बुधवारी अ‍ॅमेझॉनबरोबर याबाबतचा एक करार केला. तर असेच आणखी करार स्नॅपडील, पेपलबरोबरही करण्यात येणार आहेत.
ऑनलाइनचा वाढता वापर लक्षात घेत काही दिवसांपूर्वीच स्वत:चे इनटच हे माध्यम सुरू करणाऱ्या स्टेट बँकेने तिच्या खातेदार, ग्राहकांना ई-कॉमर्सचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅमेझॉनबरोबर सहकार्य करार केला. यासाठी मुंबईत बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य व अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
बँकेच्या खातेदारांना अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विविध उपलब्ध वस्तूंच्या खरेदी तसेच विक्रीचा चांगला अनुभव याद्वारे घेता येईल, असा विश्वासही भट्टाचार्य यांनी व्यक्त केला. लघु व मध्यम उद्योगांनाही अशा मंचाचा उपयोग होण्यासाठी बँक लवकरच पावले उचलेल. अ‍ॅमेझॉनवरही अनेक लघु व मध्यम श्रेणीतील उद्योजक आपली उत्पादने विकत असतात. मात्र त्यांना सहज कर्जसहाय्य मिळत नाही.