सेन्सेक्सने गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकावर पुन्हा स्वार होणे आणि निफ्टीने त्याचा १५ महिन्यातील वरचा टप्पा गाठणे या भांडवली बाजारातील सप्ताहारंभीच्या कृतीने गुंतवणूकदारांमध्ये एकदम उत्साह आणला. एकाच व्यवहारातील जवळपास ३०० अंशांची भर सेन्सेक्सला २८ हजाराचा प्रवास पार करण्यास सहाय्यभूत ठरली. तर जवळपास शतकी निर्देशांक वाढीने निफ्टी ८,६०० च्या पुढे यशस्वी ठरला.
अशा एकूण वातावरणात मुंबई शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य प्रथमच १०८ लाख कोटी रुपयांवर विराजमान झाले. यापूर्वी १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा वेळोवेळी पार झाला आहे.
सेन्सेक्सने यापूर्वीचा वरचा २८,१०१.९२ हा टप्पा १० ऑगस्ट २०१५ रोजी गाठला होता. तर १६ एप्रिल २०१५ रोजी निफ्टी ८,७०६.७० अशा यापूर्वीच्या वरच्या स्थानावर होता. सोमवारी सेन्सेक्समध्ये २९२.१० अंश भर नोंदली जाऊन मुंबई निर्देशांक २८,०९५.३४ वर स्थिरावला. तर ९४.९५ अंश वाढीने निफ्टी ८,६३५.६५ पर्यंत पोहोचला.
गेल्या आठवडय़ापासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आता प्रत्यक्षात वस्तू व सेवा कर विधेयक सादर होण्याची वेळ नजीक येऊन ठेपली आहे. राज्यसभेत या विधेयकाला चालू आठवडय़ात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था वाढीसाठी जी२० राष्ट्रांमध्ये उपाययोजनांवर सहमती होण्याची आशा निर्माण झाली आहे. या साऱ्यांचा परिणाम महिन्यातील शेवटच्या आठवडय़ाची सुरुवात करताना दिसून आला.
भांडवली बाजारात पुन्हा एकदा विदेशी निधी ओघ येत असल्याचे सोमवारच्या व्यवहारावरून दिसून आले. २७,७५३.९६ या वरच्या टप्प्यावर नव्या आठवडय़ाची सुरुवात करणारा सेन्सेक्स सत्रात २८,११०.३७ पर्यंत झेपावला. दिवसअखेरच्या जवळपास त्रिशतकी निर्देशांक वाढीने मुंबई निर्देशांक पुन्हा एकदा त्याच्या गेल्या ११ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाला.
सोमवारच्या सत्रात ८,६०० पुढील प्रवास नोंदविणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गेल्या १५ महिन्यांचा वरचा स्तर अनुभवला.
सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकी ३.११ टक्के, तर स्टेट बँक २.८६ टक्क्य़ांनी विस्तारला. सेन्सेक्समधील तेजीच्या यादीतील २६ समभागांमध्ये एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, सन फार्मा, एचडीएफसी, टीसीएस, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, एचडीएफसी बँक, ल्युपिन, सिप्ला, विप्रो आदी राहिले. तर घसरलेल्या समभागांमध्ये गेल, बजाज ऑटो, टाटा स्टील यांचा क्रम होता.
बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीसत्र मोठय़ा प्रमाणात आरंभल्याचे चित्र दिसले. परिणामी मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे १.०५ व १ टक्क्य़ाने वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक सर्वाधिक १.६५ टक्क्य़ाने वाढला. सोबतच वित्त, तेल व वायू, ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा, तंत्रज्ञान, वाहन आदी निर्देशांकही १.६१ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
जी२० मुळे आशियातील चीन, हाँग काँग, दक्षिण कोरियातील प्रमुख निर्देशांक तसेच युरोपातील काही निर्देशांकांमध्ये वाढ नोंदली गेली. जी२० मध्ये युरोपाशी निगडित काही देशांचा समावेश आहे.
मुंबई शेअर बाजारातील १०० लाख कोटींआसपास रखडणारे एकूण भांडवली मूल्य सोमवारी निर्देशांकाच्या अनोख्या टप्प्याच्या सहाय्याने इतिहासात प्रथमच १०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. चालू वर्षांत आतापर्यंत सेन्सेक्स १,९७७.८० अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७.५७ आहे.

रुपयाचा पाक्षिक तळ; सत्रात २७ पैसे आपटी
मुंबई : भांडवली बाजारात सप्ताहारंभी अनोखी तेजी नोंदविली गेली असतानाच परकी चलन व्यवहारात स्थानिक रुपया मात्र सोमवारी कमकुवत बनला. शुक्रवारच्या तुलनेत रुपया डॉलरसमोर २७ पैशांनी घसरून ६७.३५ पर्यंत आला. स्थानिक चलनाचा हा गेल्या दोन आठवडय़ाची तळ होता. भांडवली बाजारातील विदेशी निधी ओघ परकी चलन व्यवहारात मात्र अपयशी परिणामकारक ठरला. या मंचावरील रुपयाचे व्यवहार सोमवारी ६७.१९ अशा किमान स्तरावरच सुरू झाले. सत्रात ते आणखी खाली येत ६७.०८ पर्यंत घसरले. ६७.३६ व ६७.१६ असा प्रवास केल्यानंतर रुपया गेल्या सप्ताहअखेर तुलनेत ०.०४ टक्क्य़ांनी घसरला. रुपया यापूर्वी ८ जुलै २०१६ रोजी ६७.३७ या किमान स्तरावर होता.

बाजारमूल्य ऐतिहासिक स्तरावर
मुंबई शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य सोमवारी १,०८,०३,१५४ कोटी रुपये गेले. डॉलरमध्ये ही रक्कम १.६१ लाख कोटी नोंदली गेली आहे. मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे एकत्रित मूल्य गेल्याच आठवडय़ात, गुरुवारी १.०७ लाख कोटी रुपयांवर गेले होते. एकूण मूल्य सर्वप्रथम नोव्हेंबर २०१५ मध्ये १०० लाख कोटी रुपयांचा अनोखा पार करते झाले होते. जागतिक १० बाजारांमध्ये मुंबई शेअर बाजाराचे स्थान आहे. बाजारात सध्या २,९०० कंपन्यांच्या व्यवहार होतात.

आघाडीच्या ‘मूल्यवान’ कंपन्या :
टीसीएस रु. ५.०२ लाख कोटी
रिलायन्स रु. ३.३० लाख कोटी
एचडीएफसी बँक रु. ३.१६ लाख कोटी
आयटीसी रु. ३.०३ लाख कोटी
इन्फोसिस रु. २.४८ लाख कोटी