निफ्टी ९,६०० च्या वेशीवर; मोदी राजचा बाजारात ऐतिहासिक तेजी सोहळा..

मोदी सरकारची तीन वर्षे पूर्ण होण्याचा सोहळा भांडवली बाजारांनी शुक्रवारी अनोख्या टप्प्यासह विक्रमी स्तरावर स्थिरावत साजरा केला. जवळपास त्रिशतकी अंशवाढीने सेन्सेक्सने शुक्रवारी प्रथमच ३१ हजाराला गवसणी घातली.

भांडवली बाजाराच्या गुरुवारच्या प्रवासाच्या जोरावर सेन्सेक्स जूनमध्ये ३१ हजाराचा स्तर गाठेल ही बाजार विश्लेषकांची अटकळ नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या प्रारंभालाच खरी ठरली. तर निफ्टीने ९,६०० नजीकचा टप्पा प्रथमच गाठला.

२७८.१८ अंश वाढीसह सेन्सेक्स ३१,०२८.२१ वर पोहोचला. जवळपास एक टक्क्यांची भर टाकणाऱ्या मुंबई निर्देशांकाने एकाच व्यवहारात नवा विक्रम स्थापित केला. व्यवहारात तो ३१,०७४ पर्यंत झेपावला होता.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्याच्या अस्तित्वापासून प्रथमच ९,६००च्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. शुक्रवारी निर्देशांकात ८५.३५ अंश भर पडून निफ्टीने ९,५९५.१० हा नवा टप्पा गाठला. सत्रात तो ९,६०२ पर्यंतच जाऊ शकला.

सप्ताह तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा प्रवास सलग तिसऱ्या आठवडय़ात तेजीचा राहिला. तर शुक्रवारच्या रूपात नव्या महिन्यातील वायदापूर्तीची सुरुवातही तेजीसह झाली. चालू सप्ताहात सेन्सेक्स ५६३.२९ अंशांनी वाढला आहे. तर निफ्टीत १६७.२० अंश भर पडली आहे.

वस्तू व सेवा कर, मान्सून, थेट विदेशी गुंतवणूक यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरण हे गेल्या सहा महिन्यांपासूनच तेजीचे राहिले असल्याचे निरीक्षण मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजचे प्रमुख संशोधक गौतम दुग्गड यांनी नोंदविले आहे.

सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभाग तेजीच्या यादीत राहिले. यामध्ये आयटीसी, पॉवर ग्रिड हे आघाडीवर होते. टाटा स्टील ५.४६ टक्क्यांसह तर आयटीसी २.९९ टक्क्यांसह वाढले. तेजीत राहिलेल्या अन्य समभागांमध्ये रिलायन्स, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, ओएनजीसी, कोल इंडिया आदी राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद सर्वाधिक, ३.४० टक्क्यांसह वाढला. तर तेल व वायू, ऊर्जा, भांडवली वस्तू, वाहन, बँक आदींमध्ये २ टक्क्यांपर्यंतची वाढ झाली.

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकाची प्रमुख निर्देशांकांपेक्षा गेल्या अनेक सत्रांपासून असलेली सरस कामगिरी शुक्रवारीही राहिली. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २.०६ व १.६० टक्क्यांनी वाढले. सप्ताहअखेर आशिया बाजारही तेजीत होते. तर युरोपीय बाजारातील व्यवहारांची सुरुवातही वाढीसह झाली.

गुंतवणूकदार तीन वर्षांत ५० लाख कोटींनी श्रीमंत

  • भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकार स्थापनेनंतर सेन्सेक्स हा मुंबई निर्देशांक ६,००० हून अधिक अंशांनी वाढला आहे. तर या दरम्यान मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती ५० लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
  • २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी, २६ मे २०१७ पर्यंत सेन्सेक्समध्ये ६,३११.३३ अंश म्हणजेच २५.५३ टक्के वाढ झाली आहे. तर निफ्टीतील वाढ ३०.३८ टक्के आहे.
  • मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य या तीन वर्षांत ७५ लाख कोटी रुपयांवरून १२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या तीन वर्षांत ५० समभागांनी तब्बल १,००० हून अधिक टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. तर १,१०० समभागांचे मूल्य दुपटीहूनही अधिक झाले आहे.
  • टीसीएस सर्वाधिक ५.०८ लाख कोटी रुपये बाजार भांडवलासह आघाडीवर, तर ४.३४ लाख कोटी रुपयांसह रिलायन्स दुसऱ्या क्रमांकावर होती.

untitled-30