दहा दिवसांवर आलेल्या अर्थसंकल्पात अर्थसुधारणा तर पुढील महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणारी संभाव्य व्याजदर कपात या जोरावर भांडवली बाजाराचा प्रवास बुधवारीदेखील तेजीतच राहिला. १८४.३८ अंश वाढीसह सेन्सेक्स २९,३२०.२६ या  तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. ५९.७५ अंश वाढीसह निफ्टी ८,८६९.१० पर्यंत गेला.
सत्रात सेन्सेक्स २९,१२६.९१ ते २९,४११.३२ पर्यंत राहिला. गेल्या सलग सहा व्यवहारात मुंबई निर्देशांकाची झेप ३.८७ टक्के म्हणजेच १,०९२.८४ अंश राहिली आहे. तर निफ्टीचा बुधवारचा प्रवास व्यवहारात ८,८९४.३० पर्यंत झेपावला होता. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप हे निर्देशांक अनुक्रमे जवळपास एक टक्क्याने वाढले. सेन्सेक्स आता २९ जानेवारीच्या २९,६८१.७७ नजीक आहे.e02मंगळवारच्या सुटीनंतरच्या व्यवहारात बाजारात अर्थातच व्याजदराशी संबंधित समभागांचे मूल्य उंचावले. यामध्ये भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू तसेच वाहन क्षेत्राचा समावेश राहिला. सेन्सेक्समधील टीसीएस, टाटा पॉवर, टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, विप्रो, कोल इंडिया, सिप्ला, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयटीसी यांच्या समभागांना मागणी राहिली. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक १.८१ टक्क्यांनी वाढला. संरक्षण क्षेत्राशी संलग्न उद्योग क्षेत्राला बळ देण्याचे सरकारचे धोरण कायम राहील, या पंतप्रधानांच्या बुधवारच्या घोषणेने या क्षेत्रातील समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये पिपावाव डिफेन्स, भारत फोर्ज यांच्या समभागांचा समावेश राहिला.

सोने-चांदीत मोठा उतार
मुंबई : भांडवली बाजारातील तेजीमुळे गेल्या काही दिवसांपासून काहीशा दुर्लक्षित मौल्यवान धातू बाजारात बुधवारी अचानक मोठय़ा दर घसरणीने अस्वस्थता निर्माण केली. एकाच व्यवहारातील एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील घसरणीने सोने तोळ्यामागे २७ हजार रुपयांच्याही खाली उतरले. धातूची दिवसातील ही २०१५ मधील पहिली मोठी आपटी ठरली. स्टॅण्डर्ड प्रकारचे सोने १० ग्रॅमसाठी तब्बल ४५५ रुपयांनी कमी होत थेट २६,७२० रुपयांवर येऊन ठेपले, तर शुद्ध सोन्याचा दरही याच वजनासाठी याच प्रमाणात कमी होत २६,८७० रुपयांवर आला. सोन्याबरोबरच चांदीच्या भावही बुधवारी एकाच दिवसात किलोसाठी १,६९० रुपयांनी कमी होत ३७,६६० रुपयांवर आला. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ३८ हजार रुपयांच्या घरात असलेल्या पांढऱ्या धातूचा भावही कमी झाला. मुंबईच्या सराफा बाजारात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त व्यवहार झाले नव्हते. नवी दिल्लीच्या बाजारातही सोने प्रति तोळा ५०० तर चांदी किलोमागे १,७०० रुपयांनी रोडावले. आंतरराष्ट्रीय बाजारात सिंगापूरमध्ये सोन्याचे भाव औन्ससाठी १,२०० डॉलपर्यंत आले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बुधवारच्या उशिराच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर मौल्यवान धातूत घसरण झाल्याचे मानले जात आहे.