वायदापूर्तीचा आरंभ निर्देशांक घसरणीने

नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या पहिल्या दिवशी घसरण नोंदविताना प्रमुख निर्देशांकांनी यापूर्वीच्या सलग सहा सत्रांतील तेजीला थांबविले. विविध क्षेत्रीय निर्देशांकातील समभाग विक्रीच्या दबावामुळे अखेर सेन्सेक्स आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी ८०.०९ अंशांनी घसरून २८,८१२.८८ वर थांबला. तर ४२.८० अंश घसरणीमुळे ८,९०० चा स्तर सोडणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सत्रअखेर ८,८९६.७० वर स्थिरावला.

गेल्या सलग सहा व्यवहारांत मुंबई निर्देशांकाने ७३७.४१ अंश वाढ नोंदविली होती. यामुळे सेन्सेक्स २८,९०० नजीक होता. तर निफ्टीने त्याचा ८,९०० चा टप्पाही गाठला होता.

नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहाराचा सोमवारचा पहिला दिवस होता. असे असताना मुंबई शेअर बाजाराची सुरुवातच घसरणीने झाली. सेन्सेक्स लगेचच २८,७९१.१९ पर्यंत घसरला. त्याचा हा सत्रातील किमान स्तर राहिला. तर निफ्टीचा सोमवारचा प्रवास ८,९५१.८० ते ८,८८८.६५ असा उतरता राहिला.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक, ३.५६ टक्क्यांनी आपटला. त्याचबरोबर पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज्, टाटा मोटर्स आदी ३.१४ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई निर्देशांकामधील मूल्य वाढणाऱ्या समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग उल्लेखनीय ठरला. जिओचे एप्रिलपासून डाटा दर वाढणार असल्याने कंपनीला लाभ मिळेल, या आशेवर समभाग सत्रात ६ टक्क्यांपर्यंत उंचावला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्यही ४ लाख कोटी रुपयांवर गेले. मूल्य वाढलेल्या अन्य समभागांमध्ये हिंदुस्थान यूनिलिव्हर, विप्रो, ल्युपिन, कोल इंडिया, इन्फोसिस, टीसीएस आदी राहिले. सेन्सेक्समधील ७ समभाग वाढले तर २३ समभागांचे मूल्य रोडावले.