दुप्पट वायू दरवाढीचा निर्णय लांबणीवर टाकला गेल्याने नाराज झालेल्या कंपनी समभागांनी गुरुवारी भांडवली बाजारावर चांगलाच दबाव निर्माण करत एकूण सेन्सेक्सलाच गेल्या सहा दिवसातील सर्वात मोठी आपटी नोंदविण्यास भाग पाडले. वायदापूर्तीचे महिन्यातील अखेरचे सत्र मुंबई निर्देशांकात जवळपास अडिचशे अंशांची घसरण राखणारे ठरले.
२५१.०७ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५ हजारांवर, २५,०६२.६७ वर तर ७६.०५ अंशाने खाली येत निफ्टी ७,५०० पेक्षा कमी, ७,४९३.२० वर बंद झाला. दिवसाचा प्रारंभ तेजीने करणारे दोन्ही प्रमुख भांडवली बाजार दिवसअखेर घसरले. तर निर्देशांकांची दिवसातील आपटी ही गेल्या आठवडय़ानंतरची सर्वात मोठी ठरली.
अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी उशिरा दुप्पट वायू दरवाढीचा निर्णय आणखी तीन महिन्यांसाठी लांबणीवर टाकला. वाढीव दराचे सार्वजनिक ओएनजीसी व खासगी रिलायन्स हे प्रमुख लाभार्थी आहेत. निर्णयानंतर दोन्ही कंपन्यांच्या समभागांची गुरुवारी जोरदार विक्री झाली. गुरुवारच्या सेन्सेक्समधील घसणीत या दोन्ही समभागांचा हिस्सा १५० अंशांचा राहिला.
तेल व वायू क्षेत्रातील या प्रमुख समभागांसह गुंतवणूकदारांनी बुधवारी बँक, बांधकाम, पोलाद क्षेत्रातील निर्देशांकाचीही विक्री केली. तेल व वायू निर्देशांकातील घसरण व्यवहाराअखेर ३.८८ टक्क्यांपर्यंत गेली. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभागांचे मूल्य रोडावले. अर्थातच त्यातही आघाडी ही तेल व वायू कंपन्यांचीच होती.
वाहनांवरील कपात करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काची रचना डिसेंबर २०१४ पर्यंत कायम ठेवण्यात आल्याने मारुती सुझुकी, महिंद्र अॅण्ड महिंद्र, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प यांचा भाव वधारला. अन्यमध्ये विप्रो, एल अॅण्ड टी, भेल, भारती एअरटेल उंचावले. तर एचडीएफसी बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले.
व्यवहाराच्या सुरुवातीला २५,३०० पर्यंत उंचावलेल्या सेन्सेक्सने सत्रात २५,०२१ हा दिवसाचा नीचांकही नोंदविला. सेन्सेक्समध्ये दिवसातील यापूर्वीची मोठी घट १८ जून रोजी २७४.९४ अंशांची राहिली आहे. तर निफ्टीची हिच कामगिरी १३ जून रोजी १०७.८० अंश नोंदली गेली आहे. दोन्ही निर्देशांक त्यामुळे आता तीन आठवडय़ाच्या तळात विसावले आहेत.

रुपया पुन्हा कमकुवत
परकी चलन व्यवहारात रुपया गुरुवारी पुन्हा किरकोळ कमकुवत बनला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन २ पैशांनी घसरत ६०.१४ पर्यंत खाली आले.
तेल व वायू निर्देशांक : १०,९८२.१२ (-३.८८%)

ओएनजीसी    : रु. ४११.१०             (-५.८९%)
रिलायन्स    : रु. १,०११             (-३.७०%)