सप्ताहाच्या शेवटच्या सत्राच्या व्यवहारात भांडवली बाजार पुन्हा एकदा तेजीच्या लाटेवर स्वार झाले. किरकोळ गुंतवणूकदारांपाठोपाठ विदेशी गुंतवणूकदारांनीही खरेदीसाठी उत्साह दर्शविल्याने सेन्सेक्स शुक्रवारी ९२.७२ अंशांनी विस्तारत २७,८०३.२४ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३१.१० अंशवाढीसह ८,५४१.२० पर्यंत गेला.
गेल्या सलग दोन सत्रांत दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदविली आहे. सप्ताहअखेरच्या व्यवहारात दुपापर्यंत सेन्सेक्स तेजी-घसरणीच्या लाटेवर स्वार होता. एचडीएफसी बँक, आयटीसी, बायोकॉन या कंपन्यांच्या तिमाही वित्तीय कामगिरीच्या जोरावर बाजार दिवसअखेर निर्देशांक वाढीवर स्थिरावला.
eco03तिमाही नफ्यात १७ टक्क्य़ांची वाढ राखणारा बायोकॉन व्यवहारात १५.२८ टक्क्य़ांनी उसळला, तर वेदांताबरोबरच्या विलीनीकरणाच्या चर्चेने केर्न इंडियाने सत्रात १९८.४० हा वर्षभराचा मूल्य उच्चांक नोंदविला. राज्यसभेत येत्या आठवडय़ात वस्तू व सेवा कर येण्याच्या वृत्तानेही बाजारात दिवसअखेर तेजी राखण्यास साहाय्य झाले.
आशियाई तसेच युरोपीय बाजारात प्रमुख निर्देशांकांचा घसरणीचा प्रवास असतानाही येथे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण बैठकीपूर्वीच्या व्यवहारात, गुरुवारी अमेरिकी निर्देशांकांनीदेखील गेल्या सलग नऊ व्यवहारांतील तेजीला पायबंद घातला. सेन्सेक्स सत्रात २७,८३२.४५, तर निफ्टी ८,५४८.९५ पर्यंत झेपावला.
सेन्सेक्समध्ये मूल्य उंचावलेल्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, गेल, सिप्ला, टाटा स्टील, ल्युपिन यांचा समावेश राहिला, तर मध्यंतरातील घसरणीमुळे बजाज ऑटो, स्टेट बँक, कोल इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो यांना दिवसअखेरही घसरणीतून डोके वर काढता आले नाही.
सेन्सेक्सप्रमाणे मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक वाढ नोंदविणारे ठरले. त्यात अनुक्रमे ०.९८ व ०.८१ अंशवाढ झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, पोलाद, भांडवली वस्तू, दूरसंचार, स्थावर मालमत्ता, वाहन तसेच माहिती तंत्रज्ञान आदी १.४१ टक्क्य़ांपर्यंत वाढले.