कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबत आशादायक

सप्ताहारंभी पुन्हा सर्वोच्च निर्देशांक शिखरावर पोहोचताना भांडवली बाजार सोमवारी अनोख्या टप्प्यावर पोहोचले. अर्धशतकी निर्देशांक वाढीने सेन्सेक्स ३१,१०० नजीक तर ३० अंश वाढीने निफ्टी ९,९०० पुढे गेला. कंपन्याचे तिमाही वित्तीय निष्कर्ष व जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथील निर्देशांकांचा विक्रमी प्रवास नोंदला गेला.

व्यवहारात ३२,१३१.९२ पर्यंत मजल मारणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी शुक्रवारच्या तुलनेत ५४.०३ अंश वाढ नोंदवित ३१,०७४.७८ या सर्वोच्च टप्प्याला गाठले. तर निफ्टीने २९.६० अंश वाढीसह ९,९१५.९५ पर्यंत मजल मारली. राष्ट्रीय शेअर बाजाराची सत्रातील झेप ९,९२६ पर्यंत गेली होती.

गेल्या आठवडय़ात सलग चार व्यवहारातील तेजी व विक्रमानंतर सेन्सेक्ससह निफ्टीने सप्ताहअखेरच्या व्यवहारात घसरण नोंदविली होती. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या उच्चांकापासून माघारी फिरले होते. सोमवारी नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच सेन्सेक्स व निफ्टी तेजीच्या लाटेवर होते.

दमदार मान्सून आणि कंपन्यांचे तिमाही निकाल याच्या आशेवर बाजारात सोमवारी गुंतवणूकदारांमधील खरेदीकल दिसून आला. त्याचबरोबर सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाद्वारे आणखी काही आर्थिक सुधारणा राबविल्या जातील, अशी आशा बाजारात होती.

मुंबई निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्यांना मागणी राहिली. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांचे मूल्य अधिक उंचावले. यामध्ये विप्रो ३ तर इन्फोसिस १.३७ टक्क्य़ांनी वाढले. अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आदी तेजीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक, १.२८ टक्क्य़ांनी वाढला. तसेच पोलाद, माहिती तंत्रज्ञानही मूल्य वाढीच्या यादीत होते.

चीनच्या आर्थिक विकासाचे आकडे तसेच येत्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर भूमिकेबाबत गुंतवणूकदारांना चालू आठवडय़ात प्रतिक्षा असेल. तसा प्रतिसाद बाजारात नोंदला जाण्याची शक्यता आहे.

५ लाख कोटी रुपयांची रिलायन्स इंडस्ट्रीज

५ लाख रुपयांचे बाजार भांडवल राखणारी दुसरी कंपनी म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचा उदय झाला आहे.

विक्रमी निर्देशांक गाठणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या सोमवारच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ५,०४,४५८.०९ कोटी रुपयांवर गेले. एकाच व्यवहारात कंपनीचे बाजार भांडवल ६,६७२.०९ कोटी रुपयांनी वाढले. सत्रअखेर कंपनीचे समभाग मूल्य शुक्रवारच्या तुलनेत १.३३ टक्क्य़ांनी उंचावत १,५५१.३५ वर पोहोचले. आठवडय़ातील पहिल्या दिवसाच्या व्यवहारात समभाग १.८१ टक्के वाढ राखताना १,५५८.८० या वरच्या टप्प्यावर पोहोचला होता. कंपनी समभागाचा हा गेल्या काही वर्षांचा उच्चांकी स्तर होता. सोमवारी कंपनीच्या २.४७ लाख समभागांचे व्यवहार मुंबई शेअर बाजार तर ४२ लाख समभागांचे व्यवहार राष्ट्रीय शेअर बाजार दफ्तरी झाले. २०१७ मध्ये कंपनी समभाग आतापर्यंत ४३ टक्क्य़ांनी उंचावला आहे.

मुंबई शेअर बाजारातील टीसीएस कंपनीने सर्वप्रथम ५ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा मान २०१४ मध्ये नोंदविला होता.

  • रिलायन्स इंडस्ट्रीज           रु. ५,०४,४५८.०९ कोटी
  • टीसीएस                            रु. ४,५८,६०५.८८ कोटी
  • एचडीएफसी बँक                रु. ४,३३,१३३.०८ कोटी
  • आयटीसी                          रु. ३,९६,१७१.२५ कोटी
  • एचडीएफसी लि.               रु. २,६३,११४.१६ कोटी