‘छोटा हाथी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या छोटय़ा वाणिज्यिक वापराच्या वाहन श्रेणीत टाटा मोटर्सने गुरुवारी आणखी एक वाहन सामावून घेतले. ‘एस मेगा’ नावाचा हा एक टन क्षमतेचा छोटा ट्रक तुलनेत अधिक महाग असून त्यात अतिरिक्त वैशिष्टय़े मात्र देण्यात आली आहेत.
भारतीय वाहन बाजारपेठेत छोटय़ा ट्रकनिर्मितीद्वारे नवा पायंडा पाडणाऱ्या टाटा मोटर्सच्या एस या एक टनपेक्षा कमी वजनाच्या वाहन उत्पादनाने नुकताच विक्रीचा १५ लाखांचा टप्पा पार केला आहे. या वाहनासह कंपनी तब्बल ८५ टक्के बाजारहिस्सा राखून आहे.
चौथ्या पिढीतील २ सिलिंडरचे डायकोर डिझेल इंजिन असलेल्या ८०० सीसी क्षमतेच्या एस मेगाची इंधनक्षमता प्रति लिटर १८.५ किलोमीटर आहे. वाहनाची किंमत ४.३१ लाख रुपये (एक्स शोरुम, ठाणे) असून पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख सात शहरांमध्ये ते उपलब्ध आहे.
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूहाने त्याच्या जीतो वाहनाद्वारे प्रथमच या उत्पादन श्रेणीत काही महिन्यांपूर्वी शिरकाव केला. तर मारुती सुझुकीही छोटय़ा ट्रकनिर्मिती क्षेत्रात लवकरच उतरणार आहे. या पाश्र्वभूमीवर या गटातील वाहनांची विक्री तूर्त मंदावली असून येत्या सहा महिन्यांत हे क्षेत्र पुन्हा उभारीचे ठरेल, असा विश्वास या वेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मान्सून व सणांचा मोसम यानंतरच प्रत्यक्षातील वाहन विक्री वाढेल, असेही हे अधिकारी म्हणाले. निर्मिती, कृषी क्षेत्रातील हालचाल पूर्वपदावर आली की वाहनांची मागणीही वाढेल, असेही सांगण्यात आले.