जागतिक अव्वल ५० श्रीमंतांमध्ये तीन भारतीय उद्योगपतींचा क्रम लागला आहे. वेल्थ-एक्सने तयार केलेल्या नव्या यादीत मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी व दिलीप संघवी यांची नावे झळकली आहेत.
‘बिझनेस इन्सायडर’च्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या वेल्थ-एक्स यादीत २४.८ अब्ज डॉलर मालमत्तेसह रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे २७ व्या स्थानावर आहेत. तर १६.५ अब्ज डॉलरची मालमत्ता असलेले अझीम प्रेमजी हे ४३ व्या तर १६.४ अब्ज डॉलरसह दिलीप संघवी ४४ व्या क्रमांकावर राहिले आहेत.
यादीत नावे असलेल्या ५० उद्योजकांची मालमत्ता १.४५ लाख कोटी डॉलर गणली गेली आहे. ही रक्कम ऑस्ट्रेलियाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाइतकी आहे. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक १२ अब्जाधीश राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे ८७.४ अब्ज डॉलरसह अव्वल स्थानावर आहेत. पाठोपाठ स्पेनचे व्यावसायिक अमॅन्सिओ ओर्टेगा व गुंतवणूक गुरू वॉरन बफे हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. अ‍ॅमेझॉनचे जेफ्री बिझॉस व अमेरिकेतील डेव्हिड कोच हे पहिल्या पाचमध्ये गणले गेले आहेत. सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून ३१ वर्षीय फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आहेत. ४२.८ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह ते यादीत ८ व्या स्थानावर आहेत. यादीत सर्वाधिक अब्जाधीश, २९ जण हे अमेरिकेतील आहेत. भारतातील तीन तर चीनमधील चार श्रीमंत या यादीत आहेत. यादीत केवळ चार महिला अब्जाधीशांना स्थान मिळाले आहे. ९३ वर्षीय लोरियलच्या लिलिएन बेटेनकोर्ट (१७ वे स्थान) या सर्वात वयस्क अब्जाधीशही ठरल्या आहेत.