गेल्या काही वर्षांत भारतात ‘फेसबुक’ आणि ‘टि्वटर’सारख्या सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याची दखल घेत या कंपन्यांनी भारतातील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करीत भारतातील आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली. यासाठी संबंधीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंची नियुक्तीदेखील या कंपन्यांकडून करण्यात येत आहे. अलीकडेच ‘टि्वटर’ने तरणजीत सिंग यांची ‘हेड ऑफ सेल्स’पदी नियुक्ती केली. भारतीय उपखंडातील टि्वटरच्या व्यापाराची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. ‘टि्वटर’च्या गुडगाव येथील कार्यालयातून कामाचा कार्यभार सांभाळणाऱ्या तरणजीत यांच्यावर भारतातील ‘टि्वटर’च्या व्यावसायिक संधी वाढविण्याची मुख्य जबाबदारी असणार आहे. तरणजीत यांना विक्री आणि व्यवसाय वृद्धीच्या क्षेत्रातील १९ वर्षांचा अनुभव आहे. माध्यम क्षेत्रातील बाजारपेठेचे त्यांचे ज्ञान सर्वसमावेशक असे आहे. ‘टि्वटर’मध्ये दाखल होण्याआधी ते ‘बीबीसी अॅर्व्हटायझिंग’च्या दक्षिण अशिया क्षेत्राचे ‘विक्री अध्यक्ष’ म्हणून काम पाहात होते. ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ आणि ‘बीबीसी संकेतस्थळा’च्या उत्पन्न आणि व्यवसाय वृद्धीसाठी योजना बनविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ‘बीबीसी’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी ‘आऊटलूक पब्लिशिंग प्रा.लि.’मध्ये जाहिरात विक्री मुख्याधिकारी आणि व्यवसाय वृद्धी अधीक्षकापासून अनेक पदांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. ‘आऊटलूक’मध्ये असताना उत्तर भारतातील जाहिरात विक्री आणि व्यवसाय वृद्धीची जबाबदारी त्यांच्यावर होती. डेहराडून येथील डीएव्ही महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील पदवी मिळविणाऱ्या तरणजीत यांनी व्यवस्थापनातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या ते ‘आयएनएसईएडी’मधून ‘जनरल मॅनेजमेंन्ट लिडरशीप प्रोग्रॅम’ पूर्ण करीत आहेत.