नवीन १२८ मार्गावर क्षेत्रीय हवाई वाहतूक

क्षेत्रीय हवाई जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘उडान’ प्रोत्साहनपूरक योजनेकरिता विविध १२८ मार्ग निश्चित केले आहेत. पाच निवडक कंपन्या या मार्गावर आपली स्वस्तातील हवाई प्रवासी सेवा लवकरच सुरू करतील. या माध्यमातून विविध ७० विमानतळे जोडली जाणार आहेत.

‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) अंतर्गत देशातील विविध भौगोलिक शहरे हवाई प्रवासी वाहतुकीने जोडण्याची सरकारची योजना आहे. क्षेत्रीय विमान सेवा जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने अशा सेवांकरिता ५० टक्के आसने ही प्रति तास २,५०० रुपये अशी किमान दराने आकारण्याचे बंधन आहे. भटिंडा, पुडुचेरी, सिमला, नांडेड अशी ७० विमानतळे याद्वारे जोडली जाणार आहेत. विविध २० राज्यांमधून ही सेवा सुरू होईल.

देशात काही छोटी विमानतळे ही तूर्त कार्यरत नाहीत, तसेच अन्य छोटय़ा अशा एकूण ४५ विमानतळांवरून क्षेत्रीय हवाई प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने १२८ मार्ग निश्चित करण्यात आले आहे.

पात्र पाच कंपन्यांना अशा १२८ मार्गावरून १९ ते ७८ आसन क्षमतेची विमाने चालविता येतील, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई खात्याचे सचिव आर. एन. चौधरी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत दिली. सर्वाधिक, ५० मार्गावर एअर ओडिशा एव्हिएशनची सेवा असेल.

पात्र पाच कंपन्या

  • एअरलाइन अलाईड सव्‍‌र्हिसेस (सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाची उपकंपनी)
  • स्पाईसजेट
  • एअर डेक्कन
  • एअर ओडिशा एव्हिएशन
  • टुब्रो मेघा