देशातील चलन, समभाग, वस्तू व्यवहार क्षेत्रांत नवा खेळाडू अवतरला असून जोडीने वर्षभरात बिगर बँकिंग वित्तसंस्था, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवाही सुरू करण्याच्या तयारीत ‘व्हेरासिटी’ समूह आहे.
मूळच्या ब्रिटनमधील अल्पारीची उपकंपनी असलेल्या अल्पारी इंडियाने गेल्या २००९ पासून भारतीय चलन व्यवहार क्षेत्रात व्यवसाय केला. मुख्य कार्यकारी अधिकारी नात्याने प्रमित भट्टाचार्य यांच्याकडे त्याची सूत्रे होती. मात्र आता मुख्य प्रवर्तक कंपनी ब्रिटनमध्ये येत्या वर्षभरात भांडवली बाजारात उतरण्याचे निश्चित करतानाच भारतासह अमेरिका, जर्मनी आणि अमेरिका येथील व्यवसायातून बाहेर पडण्याचे निश्चित केले आहे.
या बदलानंतर अल्पारीचे भारतीतील ग्राहक, गुंतवणूकदार यांची सेवा अबाधित राहावी यासाठी ब्रह्मभट्ट यांनी नव्या आर्थिक वर्षांपासून व्हेरासिटी समूह स्थापन केला असून याअंतर्गत चलनसह समभाग, वस्तू बाजारातील व्यवहारही हाताळले जाणार आहेत. याचबरोबर कंपनीने देशातील म्युच्युअल फंड, बिगर बँकिंग वित्तसंस्था क्षेत्रांतही चाचपणी सुरू केली आहे. येत्या वर्षभरात हा विस्तार होईल, अशी माहिती ब्रह्मभट्ट यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
नव्या ‘व्हेरासिटी’चे व्यवहार १ एप्रिलपासूनच सुरू झाले असून ‘अल्पारी’बरोबरचे सर्व ग्राहक, गुंतवणूकदारांना या माध्यमातून अखंडित सेवा मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. समूहाला पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवेसाठीचा परवाना जूनपर्यंत अपेक्षित असून बिगर बँकिंग वित्तसंस्था म्हणून २०१४ अखेपर्यंत कार्य सुरू होईल, असेही ते म्हणाले. याचबरोबर समूह पुढील आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंड व्यवसायही सुरू करेल, असेही त्यांनी सांगितले.
ग्राहक कायम ठेवण्याबरोबरच नव्या उद्योगाचा विस्तार करण्याचाही संकल्प व्हेरासिटीने सोडला आहे. याअंतर्गत डिसेंबर २०१४ अखेर १०० कार्यालये, ६८ कर्मचारी, ३० हजार ग्राहक जोडण्यात येईल, असे ब्रह्मभट्ट म्हणाले. ‘व्हेरासिटी’चे मुख्यालय गुजरातेतील अहमदाबाद येथे असेल व तिच्या मुंबई, दिल्लीसह देशात सात शाखा असतील.