बँकांकडून निर्ढावलेले कर्जदार म्हणून हिणवले गेलेल्या विजय मल्या यांच्यावरील संकट अधिक गडद बनले आहे. युनायटेड ब्रेव्हरेजचे समूहप्रमुख असलेल्या मल्या यांना किंगफिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकपद भूषविण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जमिनीवर असलेल्या किंगफिशरवर पुन्हा व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची परवानगी मागणारा अर्ज नाकारण्यात आला आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार खात्याने मल्या यांना ऑक्टोबर २०१३ पासून पाच वर्षांसाठी अध्यक्ष बनण्यास मनाई केली आहे. तोटय़ातील किंगफिशर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास असमर्थ ठरल्यानंतर ऑक्टोबर २०१२ पासून ठप्पच आहे. दरम्यान, विविध १७ बँकांचे ७,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत ठेवणाऱ्या मल्या यांना पाच सार्वजनिक बँकांनी निर्ढावलेले कर्जदार म्हणून जाहीरही केले आहे.
मल्या यांच्या अखत्यारीतील मंगलोर केमिकल्सवरील संचालकपद त्यांनी कोणतेही कारण न देता सोडले आहे, तर त्यांच्या युनायटेड स्पिरिट्सवरील मालकी ब्रिटनच्या डिआज्जिओकडे गेली आहे. किंगफिशर एअरलाइन्सची स्थापना मल्या यांनी केली होती. ते तूर्त तिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असले तरी २०१४ च्या सुरुवातीपासून कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारीपद हे रिक्तच आहे.