आर्थिक सुधारणांवर भर कायम ठेवण्याची जेटली यांची ग्वाही

मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत भारताला आकर्षक गुंतवणूक केंद्र बनवण्यात येईल तसेच उद्योग सुरू करण्यासाठी भारतात अनुकूलता निर्माण केली जात आहे; गुंतवणुकीचे कुठलेही प्रस्ताव रोखले जाणार नाहीत, अशी ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिली.
कायद्यांमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत तसेच दिवाळखोरी संदर्भात संहिताही बदलली जात आहे. त्यामुळे सुधारणा कार्यक्रमास गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्र्यांनी तेथील ३०० उद्योगपती व गुंतवणूकदारांपुढे येत्या काही वर्षांत अनुसरण्यात येणारा सुधारणा पथ विशद केला.
युरोप व अमेरिकेतील जागतिक उद्योगांच्या प्रतिनिधींशीही जेटली यांची चर्चा झाली. राज्यसभेत बहुमत नसल्याचा ओझरता उल्लेख करून त्यांनी या कारणास्तव प्रमुख विधेयके पुढे नेता आली नाहीत, अशी कबुली दिली. वस्तू व सेवा कर विधेयक गेल्या अधिवेशनातच मंजूर होणे आवश्यक होते पण तसे झाले नाही यावर त्यांनी खंत व्यक्त केली. संवाद कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की भारतात जे घडते आहे त्याची दखल जगातील गुंतवणूकदार घेत आहेत, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जगात महत्त्वाच्या स्थानावर पोहोचेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होत आहे. खासगी गुंतवणूक, परदेशी गुंतवणुकीला उत्तेजन दिले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.