सेरा सॅनिटरी वेअर म्हणजे पूर्वाश्रमीची ‘मधुसूदन ऑइल अॅन्ड फॅट्स’. या कंपनीचे २००२ मध्ये सेरामध्ये रूपांतर झाल्यावर किंवा व्यवसाय बदलल्यावर कंपनीने आपल्या गुणवत्ता आणि विविधतेच्या जोरावर खूपच मोठी मजल मारली आहे. सेरा म्हटले की डोळ्यासमोर येतात ती वॉश बेसिन्स, सिंक्स, युरिनल्स, बाथरूम्स, शॉवर पॅनल, बाथ टब्स, डिजायनर टाइल्स, कमोड्स, फ्लश अशी विविध उत्पादने. खरे तर सॅनिटरी वेअर हे असंघटित आणि मोठी स्पर्धा असलेले क्षेत्र. मात्र तरीही कंपनीने आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि वेगळेपणा सिद्ध करून कायम प्रगतीच केली आहे. मंदीच्या काळातही कंपनीने उत्तम कामगिरी केल्याने तिचा शेअरचा भाव चढाच राहिलेला दिसतो. यंदाच्या आíथक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे कंपनीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत २८% वाढ होऊन ती रु. १६२.३० कोटींवर गेली आहे. तर नक्त नफ्यातही २२% वाढ होऊन तो रु. १३.६० कोटींवर गेला आहे. गुजरातच्या  माडजिल कडी येथून उत्पादन करणारी ही कंपनी आपली उत्पादने किरकोळ दुकानाखेरीज, ‘सेरा बाथ स्टुडिओ’ या विशिष्ट आणि खास दालनांतून विकते. सध्या भारतातील सर्व मोठय़ा शहरांतून म्हणजे अहमदाबाद, बंगळुरू, चंदिगढ, कोलकत्ता, हैदराबाद आणि मुंबई येथे ही दालने आहेत आणि येत्या काही वर्षांत हे जाळे अजून वाढेल.  यंदाच्या आíथक वर्षांत कंपनी रु. ७७५ कोटींच्या उलाढालीवर रु. ६३ कोटींचा नफा कमावेल अशी आशा आहे. कर्ज परतफेडीमुळे कंपनीचे डेट इक्विटी गुणोत्तरही अजून खाली येईल असे वाटते. सध्या रु. १,२०० च्या आसपास असलेला हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही वर्षभरात तुम्हाला २५% परतावा देऊ शकेल.