पुन्हा ८ टक्क्यांनी गृहकर्ज मिळण्याचे दिवस दूर नाहीत!
देशाच्या गृहवित्त क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे सर्वात स्वस्त कर्जाचे व्याजदर हे आजवरचे ठळक वैशिष्टय़ राहिले आहे. याच जोरावर आगामी काळासाठी २५ टक्के व्यवसायवृद्धीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे सह-व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार हुडा यांनी सांगितले, किंबहुना गृहकर्जाचे व्याजदर आठ टक्क्य़ांपर्यंत खालावण्याचे दिवस लवकरच येतील, असा त्यांचा विश्वास आहे.
*  गृहनिर्माण उद्योगात मंदीची स्थिती आहे. मुंबईत विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठी आहे, मात्र गृहवित्त कंपनी म्हणून तुमच्या व्यावसायिक प्रगतीचा आलेख खूप उंच आणि कोणतीही मरगळ न दाखविणारा कसा?
– गृहनिर्माणात जी मंदी आहे म्हटली जाते ती महागडय़ा मालमत्तांबाबत खरी असेल; पण आम्ही लक्ष्य केलेला ग्राहक वर्ग हा २० ते २५ लाख किमतीची घरे घेऊ इच्छिणाऱ्यांचा आहे. मागणीतील मंदीचा संबंध या प्रकारच्या घरांबाबत नक्कीच नाही. संपूर्ण देशभरात ५० लाख रुपये किमतीपर्यंतच्या घरांना आजही मोठी मागणी आहे. एकूण गृहवित्त उद्योगच यामुळे १६-१७ टक्के दराने प्रगती करीत आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने सरासरीपेक्षा २० टक्क्यांचा वृद्धिदर कायम राखला आहे.

* तुमच्या कर्जदार ग्राहकाचे सरासरी कर्जमूल्य प्रमाण किती आहे?
– आमच्याकडे गृहकर्ज मिळविणाऱ्या ग्राहकांचे (तिकीट साइझ) सरासरी २४ लाख रुपयांचे कर्ज मूल्य आहे आणि आम्ही जाणूनबुजून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

* गृहकर्जाचा दर हा या क्षेत्राला लाभलेला स्पर्धात्मकतेचा महत्त्वाचा पैलू आहे, तुम्ही या बाबीकडे कसे पाहता?
– आजच्या घडीला गृहवित्त उद्योगातील सर्वात कमी १०.१५ टक्के दराने आम्ही गृहकर्ज वितरित करीत आहोत. गृहवित्त हे अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्र आहे आणि कर्जाचा दर हा त्यातील ग्राहकांना आकर्षित करणारा प्रमुख घटक आहे. आमची प्रस्तुती ही एचडीएफसी आणि आघाडीच्या बँकांच्या गृहकर्ज योजनांना समोर ठेवून त्या अनुषंगाने दरनिश्चिती करून होत असते.

* रिझव्र्ह बँकेने आपले धोरण दर स्थिर ठेवण्याचे परिणाम काय संभवतात?
– गृहवित्त कंपन्यांचे नियमन बँकांप्रमाणेच होत असल्याने, रिझव्र्ह बँकेचे पतधोरण आमच्या दृष्टीने उत्सुकतेचा मुद्दा असतो. रिझव्र्ह बँकेने सध्या अपेक्षेप्रमाणे दरकपात केली नसली, तरी नजीकच्या काळात बहुधा फेब्रुवारी २०१५ मध्ये अथवा एप्रिलमध्ये तरी दरकपात निश्चितच होईल. ही कपात अर्धा टक्क्यांच्या घरात होण्याचे अंदाज आहेत. म्हणजे सध्या ८ टक्के असलेला रेपो दर ७.५० टक्क्यांवर येईल. व्याजाचे दर खाली येणे ही एकूण स्थावर मालमत्ता उद्योग, गृहवित्त उद्योग आणि सामान्य ग्राहक सर्वाच्याच दृष्टीने स्वागतार्हच गोष्ट असेल.

* एक गोष्ट निश्चितच आहे की, पुढच्या वर्षांत केव्हा तरी व्याजाचे दर खाली येतीलच; पण हे गृहीत धरून तुम्ही व्यवसायवृद्धीबाबत वाढीव उद्दिष्ट ठेवले आहे काय?
– गेल्या दोन तिमाहीत आमच्या गृहकर्ज वितरणाच्या दरात २० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आगामी वर्षांसाठी आम्ही २० ते २५ टक्के वृद्धिदराचा अंदाज बांधला आहे. वाढीव अंदाजामागे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात आणि गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाली वाढतील, असे गृहीतक निश्चितच आहे. हे असे घडले तर २५ टक्के दराने व्यवसाय वाढ शक्य होईल. यापेक्षा अधिक वृद्धिदर शक्य आहे; पण आम्हीच खबरदारी म्हणून बांध घालण्याची काळजी घेऊ. जास्त वृद्धीबरोबरीने चुका घडण्याच्या शक्यताही वाढू नयेत, याची काळजी घेतली जाईल.

* विशेषिकृत बँकांसाठी परवाने खुले झाले आहेत. तुमच्या समूहाचे काही स्वारस्य आहे काय?
– लघु बँक अथवा पेमेंट बँकेसाठी रिझव्र्ह बँकेने परवाने खुले केले आहेत. आमच्यासारख्या बडय़ा वित्तीय संस्थेला त्यात स्वारस्य असण्याचे कारण नाही; परंतु युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठी आम्ही अर्ज दाखल केला होता. या परवान्यासाठी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यास, आम्ही त्यात पुन्हा सहभागी होऊ.

* रोखे बाजार तेजीत आहे. रोख्यांचा परतावा दर दोन वर्षांपूर्वी नीचांकाला जाणे हे व्याजाचे दर खाली येण्याचे संकेत आहेत. तुमचे अनुमान काय?
– आमचा ठाम कयास आहे की, रोखे बाजारातील तेजी यापुढेही कायम राहील. पुढच्या तीन वर्षांत चलनवाढीचा अर्थात महागाईचा दर हा चार टक्क्यांच्या घरात येईल. रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरांचाच अंदाज हा २ ते ६ टक्क्यांदरम्यानचा आहे. तसे घडले तर व्याजाचे दर ६ टक्क्यांवर येतील. याचा अर्थ आमच्यासारख्या गृहवित्त कंपनीला पैशांच्या उपलब्धतेचा दर कमी होईल. त्यामुळे अर्थातच याचे लाभ आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षांत पुन्हा गृहकर्जाचे व्याजदर हे ८ टक्क्यांच्या पातळीवर आल्यास नवलाचे ठरणार नाही.