आयुर्विमा व्यवसायात ‘इर्डा’ने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे पॉलिसीच्या रचनेत ग्राहकांच्या दृष्टीने अनेक विधायक बदल घडले आहेत. कधी नव्हे इतकी पारदर्शकता आणि सोपेपणा विम्याच्या पॉलिसीत आली आहे, तर ऑनलाइन विक्रीमुळे विम्याची खरेदीही सोयीस्कर बनली आहे. वित्तीय उत्पादनांबद्दल वाढती जाण आणि अर्थसाक्षरतेतून हे असे बदल क्रमप्राप्तच ठरले असले तरी आजही विम्याच्या विक्रेता म्हणून सल्लागाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे आयसीआयसीआय    प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि उत्पादन विभागाचे प्रमुख नीरज शहा यांचे म्हणणे आहे. ग्राहकांशी संपर्काचा हा महत्त्वाचा दुवा असून, विमा कंपन्यांच्या सेवा गुणवत्तेचा कस यातून लागेल आणि वाढत्या अर्थसाक्षरतेतून ‘गैरविक्री’लाही आपोआपच पायबंद बसेल, असे त्यांनी या मुलाखतीत मत व्यक्त केले.  
* आयुर्विमा उत्पादनांमध्ये फेरबदल झाले आहेत. प्रथम ‘युलिप’ योजनांमध्ये तर अलीकडे पारंपरिक योजनांचे स्वरूपही पालटले आहे. या बदलांचे ग्राहकांच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम काय सांगता येतील?

– युनिटसंलग्न ज्याला युलिप असे म्हटले जाते ती तसेच पारंपरिक उत्पादने दोहोंमध्ये ‘इर्डा’ या नियामक संस्थेने फेरबदल आणले आहेत. आयुर्विमा उत्पादने ही मुळात एक दीर्घ मुदतीचा करार असतो, त्यामुळे ग्राहकांनी संपूर्ण मुदतपूर्तीपर्यंत या योजना चालू ठेवणे हे त्यांच्या हिताचे ठरेल. कर्त्यांच्या पश्चात कुटुंबाचे आर्थिक संरक्षण तसेच दीर्घ मुदतीच्या बचतीचा पर्याय म्हणून आयुर्विम्याकडे पाहिले जाण्याच्या दृष्टिकोनालाच नव्या बदलांनी ठळकपणे अधोरेखित केले आहे.
युलिपमधील बदल हे २०१० सालापासूनच अमलात आले आहेत. या योजनांमधील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे ‘रिडक्शन इन यील्ड (आरआयवाय)’ला म्हणजे ग्राहकांच्या प्राप्ती कपातीवर विशिष्ट मर्यादा आणली गेली आहे. हे आरआयवाय म्हणजे ग्राहकांनी भरलेल्या रकमेवर फंडांचा प्रत्यक्ष परतावा आणि वेगवेगळे शुल्क वजा जाता ग्राहकांच्या हाती पडणारी रक्कम यातील फरक होय. हा फरक कमीत कमी राखला गेल्याने अर्थातच पॉलिसीधारकांच्या परताव्यात वाढ झाली आहे. शिवाय पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण होण्याआधी हप्ते भरणे बंद केल्यास, भरलेली रक्कम ही ‘विलग निधी’त (discontinuous fund) जमा होते आणि त्यावर किमान ४% दसादशे दराने व्याज पुढची पाच वर्षे तरी द्यावे लागते. या दरम्यानच्या काळात पॉलिसीधारक आपली संपूर्ण फंड व्हॅल्यू कोणत्याही शुल्काविना काढून घेऊ शकेल. पारंपरिक योजनांमध्ये झालेल्या बदलांमध्ये सर्वात वैशिष्टय़पूर्ण बदल म्हणजे किमान विमाछत्र वाढविले गेले जेणेकरून पुरेसे संरक्षण प्रदान केले जाईल. प्रत्याभूत समर्पण मूल्य (गॅरंटिड सरेंडर व्हॅल्यू) वाढले आहे. दीर्घ मुदतीच्या बचतीचा शिरस्ता लोकांमध्ये रुजविला जाणे आवश्यक आहे, याकामी विमा वितरकांची भूमिका ध्यानात घेतली आहे. म्हणूनच पॉलिसीच्या पूर्णावधीपर्यंत विमा हप्ते भरले जाण्याशी वितरकांचे कमिशन जुळविले गेले आहे, जेणेकरून पॉलिसीधारकांकडून नियमित हप्ते भरले जातील, याची काळजी वितरकांकडून घेतली जाईल. ‘इर्डा’ने केलेले हे बदल पॉलिसीधारकांच्या फायद्याचे आहेत.

*  ‘इर्डा’चे नवे नियम अमलात आल्यानंतर, आयुर्विमा कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणात नवीन उत्पादने बाजारात आणली जातील, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे काही घडलेले दिसून येत नाही, तुम्ही याकडे कसे पाहता?
– ‘इर्डा’चे नवीन नियम हे १ जानेवारी २०१४ पासून लागू झाले. या नव्या नियमांशी अनुरूप नवीन उत्पादने असतील याची काळजी घेत आम्ही ती ‘इर्डा’च्या संमतीसाठी त्या आधीच दाखल केली होती. त्यामुळे लगोलग जानेवारीपासूनच नवीन उत्पादने बाजारात आली. पॉलिसीच्या रचनेत नियमानुसार फेरबदल जुन्याच योजनांना नवे नाव देऊन त्या बाजारात आणणे ‘इर्डा’लाही अपेक्षित नव्हते. मुळात ग्राहक जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे आणि त्याची आर्थिक उद्दिष्टे कोणती या पडताळा करूनच सुयोग्य पॉलिसीची निवड ग्राहकांनी करायची असते. काळानुसार गरजा, पसंतीक्रम बदलत जातील, त्यानुरूप नवीन उत्पादने बाजारात येणे क्रमप्राप्तच आहे.
* आयसीआयसीआय प्रुडेन्शियलकडून कोणती नवीन उत्पादने आली आणि किती येऊ घातली आहेत?
– सध्याच्या घडीला आम्ही सहा युनिटलिंक्ड आणि आठ नॉन-लिंक्ड उत्पादने नव्या नियमांशी अनुरूप बाजारात आणली आहेत.
* तुमच्या कंपनीच्या व्यवसायातील मोठा हिस्सा हा युलिप उत्पादनांचा आहे. पण गत काळात युलिप योजनांचा परतावा हा जसे चित्र रंगविले गेले तितका सरस तर नव्हताच, उलट अन्य गुंतवणूक पर्यायांपेक्षाही तोकडा होता. तुमची यावर प्रतिक्रिया काय? या संबंधाने तुमच्या युलिप योजनांच्या कामगिरीचे काही वेगळेपण सांगू शकाल काय?
– सुरुवातीची काही वर्षे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा जवळपास १०० टक्के व्यवसाय हा युलिप योजनांवर बेतलेला होता. आजही हे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात जाणारे आहे. युनिटसंलग्न योजनांतून ग्राहकांना दीर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळविता येतो यावर ठाम विश्वास असल्यानेच, या उत्पादन वर्गवारीवर आमचा कायम भर राहिला आहे. युनिटसंलग्न उत्पादने ही आज पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शी, करसक्षम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमाधारकांना त्यांच्या जोखीमक्षमतेनुसार गुंतवणुकीला विभागण्याची मुभा आणि लवचीकताही प्रदान करतात. आमच्या युलिप योजनांबद्दल विचाराल तर, आमच्या ९६ टक्के फंड योजनांनी सातत्याने त्यांच्या मानदंडांच्या (बेन्चमार्क्स) तुलनेत सरस परतावा दिला आहे. कोणत्याही कालावधीत आणि कितीही वर्षांसाठी ही तुलना करून पाहता येईल.
* सध्याच्या घडीला विम्याची ऑनलाइन खरेदी लोकप्रिय बनत आहे, या क्षेत्रावर तुमचा भर कसा आहे? कोणत्याही मध्यस्थाविना विम्याची खरेदी होत असल्याने ग्राहकांच्या दृष्टीने ऑनलाइन विमा खरेदी किफायतशीर ठरते काय?
– माझे मत विचाराल तर आयुर्विमा उत्पादनांच्या खरेदीचा हा डिजिटल पर्याय ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचा बनला आहे. सध्या माहिती महाजालात म्हणजे सहजगत्या ऑनलाइन उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांना त्यांच्यासाठी सुयोग्य विम्याच्या निवडीचा निर्णय घेण्यास खूपच मदत झाली आहे.
आज आमचे कोणतेही उत्पादन इंटरनेटच्या साहाय्याने वेबस्थळावर जाऊन खरेदी करण्याची सोय आम्ही केली आहे, इतकेच नव्हे त्यांची वितरकांमार्फत विक्रीही डिजिटल मंचाद्वारेच सुरू केली आहे. आमचे विमा सल्लागार त्यांच्यापाशी असलेल्या विशेष टॅब्लेट्सच्या आधारे ग्राहकांच्या गरजांचे विश्लेषण करून त्यांना पॉलिसीबाबत त्यांच्या समक्षच मार्गदर्शन करतात. एकदा अशा तऱ्हेने खरेदी करावयाच्या पॉलिसीची निश्चिती झाल्यावर, अर्ज भरणे, दस्तऐवज (‘केवायसी’ प्रक्रिया) आणि पैशांचा भरणाही ऑनलाइन आणि विनाविलंब पार पडतो. माझ्या मते आजही बहुतांश विमाधारकांना सुयोग्य सल्ला व मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असून, डिजिटल माध्यमांनी अनेक गोष्टी सोयीच्या केल्या असल्या तरी विमा सल्लागाराची या व्यवसायातील मध्यस्थ म्हणून प्रधान भूमिका यापुढेही कायमच राहील. वाढती अर्थसाक्षरता ‘गैरविक्री’ (मिससेलिंग)च्या प्रवृत्तीचा आपोआपच बंदोबस्त करेल.
* ऑनलाइन विमा खरेदीदाराची मृत्यूसंबंधाने जोखीम (मॉरटॅलिटी रिस्क) ही कमी असल्याचे विमा कंपन्यांकडून गृहीत धरले जाते काय? ऑनलाइन विमा खरेदीत हप्त्यांचे दर तुलनेने कमी असण्यामागे हेच कारण आहे काय?
– जो ग्राहक ऑनलाइन विमा खरेदी करतो तो मुळात विम्यासंबंधाने जाणकार आणि अर्थसाक्षर आहे, असे एक गृहीतक निश्चितच आहे. वाढत्या अर्थसाक्षरतेनुरूप, वित्तीय योजनांबद्दलची जाणीवही उंचावत चालली आहे आणि विमा पॉलिसीची खरेदी करताना ग्राहकांकडून दिली जाणारी माहिती ही वस्तुस्थितीला धरून व पूर्ण सत्य असणे आवश्यक आहे, हे ऑनलाइन ग्राहकांनाही पूर्णपणे माहीत आहे. दाव्याच्या सुलभपूर्ततेसाठी हे आवश्यकच असल्याचे आता लोकांच्या ध्यानात आले आहे. ऑनलाइन पॉलिसीमध्येही हप्त्यांच्या दर हे तुलनेने सारखेच असतात. विम्याची निवड करताना हप्त्याच्या दरापेक्षा माझ्यामते, विमा कंपनीचा दावे निवारणाची (क्लेम सेटलमेंट) कामगिरी, खरेदीच्या प्रक्रियेतील सुलभता आणि देऊ करण्यात आलेली सेवा गुणवत्ता याबाबींना अधिक प्राधान्य मिळायला हवे.