‘‘काय बाई या चिमणूटल्या. एवढी कलकल का करतायेत!’’ साळुंकीताई स्वत:शीच म्हणाली नि ती चिमण्यांच्या जवळ गेली.
तिने चिमण्यांना विचारलं, ‘‘काय गं बायांनो काय झालं? एवढा दंगा का करताय? काही संकट का आलं आहे?’’
bal02तिथली एक चिमणी पुढे झाली आणि म्हणाली, ‘‘हो ना साळुंखीताई, बघ ना तो केवढा मोठा पक्षी आमच्या घरटय़ांभोवती घिरटय़ा घालतोय केव्हाचा. त्याला हाकलायसाठी आम्ही ओरडतोय, पण तो हलतच नाहीये. आम्हाला आमच्या पिल्लांची, अंडय़ांची खूप काळजी वाटतेय गं.’’ सांगता सांगता तिचा गळाच दाटून आला.
साळुंखीताईला फारच काळजी वाटली. तिनं झाडात डोकावून पाहिलं. तीही घाबरलीच आणि पटकन म्हणाली, ‘‘अगं बाई, कुठल्या तरी शिकारी पक्ष्याचं पिल्लू आहे की हे! गिधाड की गरुड? आणि केवढं मोठं ते! या चिमण्यांना काही दाद द्यायचं नाही!’’ तिने चिमण्यांना धीर दिला आणि म्हणाली, ‘‘तुम्ही घाबरू नका. सगळ्या एकत्रच राहा आणि तुमच्या घरटय़ांचं रक्षण करा.’’
‘‘अगं ताई, पण असं किती वेळ करणार आणि दाणापाणी कधी आणणार मग आम्ही.’’ एक चिमणी रडतच म्हणाली.
‘‘हो गं बाळा, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला एकटय़ांना नाही बधणार तो पक्षी. मला थोडा वेळ द्या. मी आत्ता सगळ्या पक्ष्यांकडे जाते आणि सगळ्या  घेऊन येते, सगळे मिळून त्याला हाकलून देऊ.’’
तिचं बोलणं ऐकून चिमण्यांना धीर आला आणि त्या नव्या जोमाने कलकलाट करू लागल्या.
इकडे साळुंखीने सगळ्या पक्ष्यांना गोळा केलं आणि परिस्थिती समजावून सांगितली. ती त्यांना म्हणाली, ‘‘आम्ही सगळ्या साळुंख्या जात आहोत चिमण्यांना मदत करायला, पण तो पक्षी खूप मोठा आहे. पोपट, कावळेदादा, कबूतरांनो, तुम्हीही सगळे आलात तर बरं होईल रे.’’
कावळा पटकन म्हणाला, ‘‘बघतील ना चिमण्या त्यांचं त्यांचं. आपल्याला काय करायचंय, उगाच कशाला आपला जीव धोक्यात घालायचा.’’
‘‘नाहीतर काय, आपल्याला कुठे काही त्रास आहे त्या पक्ष्याचा.’’ पोपटानेही कावळ्याचीच री ओढली.
साळुंखीला त्या दोघांच्या बोलण्याचं फार वाईट वाटलं. ती म्हणाली, ‘‘अरे, पण आपल्या मित्राला नको का मदत करायला आपण. आणि खरं सांगू का, मी पाहिलाय तो पक्षी. आत्ता आपल्याला काही धोका नाहीये त्याच्यापासून. पण तो मोठा झाला की, त्याचं चिमण्यांच्या पिल्लांवर किंवा चिमण्यांवर भागणार नाही. जशी जशी त्याची भूक वाढेल तसं तसं तो आपली पिल्लं आणि मग आपल्यालाही खाणार. भविष्यात आपल्यालाही धोका आहेच बरं त्याच्यापासून.’’
‘‘हो, पण तूच म्हणालीस ना की मोठा आहे तो पक्षी आपल्यापेक्षा. मग आपण कसं घालवणार त्याला?’’ कबुतरानं विचारलं.
 त्याला समजावत साळुंखी म्हणाली, ‘‘अरे, आज तो पक्षी पिल्लू आहे म्हणून लहान आहे. आपण आपली एकी आणि ताकदीच्या बळावर त्याला आत्ता अगदी आरामात हाकलून देऊ शकतो. आपलं सगळ्यांचं असं एकमेकांना सांभाळून राहणं त्यानी बघितलं की, तो पुन्हा इकडे येण्याच्या फंदात पडणार नाही. पण आत्ता आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर नंतर मात्र आपणही काही करू शकणार नाही.’’
साळुंखीचं बोलणं ऐकून सगळे विचारात पडले. त्यांना तिचं बोलणं लगेचच पटलं आणि मग काय.. कावळे, कबूतरं, साळुंख्या, पोपट अशी सगळ्यांची भली मोठी फौजच तयार झाली आणि ती त्या पक्ष्यावर चालून गेली. चिमण्यांनाही हुरूप आला. सगळ्यांनी मिळून जोराजोरात आवाज करायला सुरुवात केली. त्या पक्ष्याने या कलकलाटाकडे आधी दुर्लक्षच केलं. पण जसाजसा आवाज वाढू लागला आणि सगळ्या पक्ष्यांचा भला मोठ्ठा जथ्था त्याच्या अधिकाधिक जवळ येऊ लागला, तशी त्याला भीती वाटली. एवढे सगळे पक्षी बघून तो इकडे-तिकडे उडू लागला. या फांदीवरून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर.. पण पक्षीसेना काही त्याचा पाठलाग सोडेचना. जमेल तिथे जमेल तसे त्याला चोचीने टोचायला लागली. त्याला जखमा होऊ लागल्या. कबुतरांनी तर त्याच्या डोळ्यांवरच चोची मारायला सुरुवात केली. त्यामुळे तर तो पक्षी खूपच घाबरला आणि स्वत:चा जीव वाचवायसाठी जोरात उडू लागला. त्याला वाटले, ‘‘अरे बाप रे! उगीच आलो इकडे. हे सगळे पक्षी तर आपल्याला मारूनच टाकतील. मी परत इकडे कध्धी कध्धीच येणार नाही,’’ असे म्हणत तो दूर दूर उडून गेला. सगळी  ्रपक्षीसेना आनंदाने नाचू लागली.
चिमण्यांनी सगळ्यांचे आभार मानले. त्यावर कावळा म्हणला, ‘‘अगं चिमणूटले आम्ही फक्त तुलाच मदत केली असं नाही, तर आम्ही आमच्याही पिल्लांचं रक्षण केलंय बरं का. इथून पुढे आपण सगळे असेच एकोप्याने राहू. म्हणजे मग आपल्याला कोणी त्रास देणार नाही. काय साळुंखीताई बरोबर बोलतोय ना मी.’’ कावळा खटय़ाळपणे म्हणाला.
साळुंखीही हसतच म्हणाली, ‘‘अगदी बरोबर आहे बरं कावळेदादा!’’
‘‘हो हो, बरोबर, अगदी बरोबर! एकीचं बळ मग मिळणारच की फळ!’’ असे म्हणत सगळे पक्षी किलबिलाट करू लागले आणि झाडांची पानंही आनंदानं सळसळू लागली.
– डॉ. गीतांजली घाटे

*******

वानर शिरलं घरी
भल्या सकाळी एक वानर शिरलं आमच्या घरी
बघून त्याच्या टणटण उडय़ा घाबरली सारी।।

पेपर वाचत हॉलमध्ये आजोबा होते बसलेbal07
टर्रकन ओढून पेपर त्याने टरटर फाडून टाकले
समोर बघता वानर आजोबांना आठवली वारी
भल्या सकाळी एक वानर शिरलं आमच्या घरी।।

मेजावरचा बाबांचा मोबाइल त्याने उचलला
चटचट बटणं दाबून चिकचिक बोलू लागला
तो मोबाइल तर लागला आमच्याच शेजारी
भल्या सकाळी एक वानर शिरलं आमच्या घरी।।
अजून दादा पलंगावरती झोपला होता पांघरून
वानर त्याच्या पोटावरती ऐटीत बसले जाऊन
बघून वानर तिथेच दादाची ओली झाली सारी
भल्या सकाळी एक वानर शिरलं आमच्या घरी।।

स्वयंपाकघरामध्ये आई तिंबत होती पीठ
वानराने ओंजळभर पिठात टाकले मीठ
बघता वानर आईची करपून गेली भाकरी
भल्या सकाळी एक वानर शिरलं आमच्या घरी।।

देवघरामध्ये आजी पूजा करीत होती
वानराला दिसली तिथे मारुतीची मूर्ती
मूर्ती बघून वानराची शांत झाली स्वारी
भल्या सकाळी एक वानर शिरलं आमच्या घरी।।
     
बालाजी मदन इंगळे