बंगाली तणमोर (Bengal Florican/ Houbaropsis bengalensis) म्हणजे माळढोकाच्या कुळातील मध्यम आकाराचा असा हा जमिनीवर राहणारा पक्षी आहे. याची उंची साधारणत:   दोन फूट असून, नराचा रंग काळा, तर मादीचा भुरकट तपकिरी असतो. हे पक्षी अतिशय लाजऱ्या lok26स्वभावाचे असतात आणि शक्यतो माणसासमोर येणे टाळतात. हा तणमोर फक्त दक्षिण आशियामध्ये सापडतो. यांचे दोन गट आहेत- एक भारत आणि नेपाळमध्ये, तर दुसरा कंबोडिया आणि व्हिएतनाम येथे सापडतात. हा पक्षी पूर्वी बांगलादेशमध्ये सापडत असे, पण आता तो तेथून नामशेष झाला आहे. भारतात हा प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश इ. राज्यांमध्ये सापडतो. उंच गवताचे मैदानी प्रदेश हे त्यांचे आवडते वसतिस्थान होय. अशा गवताळ मैदानातील सखल कोरडे भाग किंवा जंगलाशेजारील पाणथळ जागेतील गवताळ भूभाग येथे ते वास्तव्य करतात. या पक्ष्याने काही भागात बदलणाऱ्या भूभागामुळे उसाच्या शेतातही वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे.  
विणीच्या हंगामात तो हमखास जंगलाशेजारील गवताळ भागात घरटे करतो. जन्माला येणाऱ्या पिल्लांना निवाऱ्यासाठी असा अधिवास खास उपयोगी पडतो. यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो. या कालावधीत नर अतिशय सुंदर असे नृत्य करतो. तो खुल्या मैदानात ४५ अंशाच्या कोनात हवेत उडी मारतो आणि अर्धवर्तुळाकार आकारात उडून जमिनीवर उतरतो. हे नृत्य तो सकाळी सूर्योदयाच्या व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करतो. चांगल्या जागांसाठी नरांमध्ये चुरस असते. याचे घरटे म्हणजे गवतात केलेला एक खळगा असतो. त्यात मादी एक-दोन अंडी घालते. मादी एकटीच अंडी उबवते आणि पिल्लांची काळजी घेते.           
जगभरात सुमारे १००० बंगाली तणमोर अस्तित्वात असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यामुळेच यांची गणना अतिसंकटग्रस्त प्रजातींमध्ये केली जाते. यांच्या घटणाऱ्या संख्येमागचे मुख्य कारण म्हणजे यांचा वेगाने नष्ट होणारा अधिवास होय. लाखो लोक उपजीविकेसाठी या गवताळ मैदानांचा वापर करतात. ते प्रामुख्याने हंगामी शेती, गवत कटाई आणि विक्री, पशुपालन, सिंचनासाठी पाणी अशा गोष्टींसाठी यांवर अवलंबून आहेत. पण गेल्या काही दशकांत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही गवताळ मैदाने शेतीत बदलली जात आहेत. तसेच अर्निबध गुरे चराई, गवताळ मैदानांना लावण्यात येणारे वणवे, गवताळ प्रदेशातील पाणथळ जागांचा सिंचनासाठी होणारा उपसा, सिंचनासाठी बांधण्यात येणारे सांडवे आणि धरणे, गवताळ मैदानावर होणारे खुरटय़ा जंगलाचे आणि परदेशी वनस्पतींचे आक्रमण, अनियंत्रित विकास आणि त्यासाठी होणारा जमिनीचा वापर अशी अनेक कारणे ही परिसंस्था नष्ट होण्यासाठी कारणीभूत आहेत.
बंगाली तणमोराच्या संवर्धनासाठी नेपाळ आणि भारत येथे प्रयत्न चालू आहेत. भारतात दुधवा, दिब्रू साईखोवा आणि काझिरंगा या संरक्षित क्षेत्रात यांची संख्या स्थिर आहे. पण संरक्षितक्षेत्राबाहेर यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. भारतात ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ आणि नेपाळमध्ये ‘बर्ड लाइफ इंटरनॅशनल’ या संस्थांनी सॅटेलाइट टेलिमेट्रीच्या साहाय्याने यांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याचा फायदा तणमोराच्या हालचाली जाणून घेण्यासाठी होईल. बंगाली तणमोराच्या संवर्धनासाठी त्यांची संख्या स्थिर राखणे, अधिवासाचे संरक्षण करणे, स्थानिक लोकांना पर्यायी रोजगार निर्माण करून देणे असे प्रमुख टप्पे आहेत. यांच्या संवर्धनामुळे इतर प्राण्यांनाही फायदा होणार आहे. याच परिसंस्थेत खुजे रानडुक्कर (Pygmy Hog) आणि राठकेशी ससा (Hispid Hare) असे दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्राणी सापडतात. त्याचबरोबर एकशिंगी गेंडा, हत्ती, जंगली म्हैस आणि दलदली हरीण असे प्राणीही याच प्रदेशात राहतात. या सर्व प्राण्यांबरोबर उंच गवताचे मैदानी भाग शाबूत राहतील. यामुळे आपणास पाणी, पाळीव प्राण्यांसाठी गवत, कार्बनची साठवणूक अशा परिसंस्थासेवा विनामूल्य मिळत राहतील. या परिसंस्थासेवांचे मूल्यांकन करणे कठीण असते, पण बंगाली तणमोराच्या अनुषंगाने आपणास या परिसंस्थासेवा विनामूल्य मिळत राहतील आणि लाखो लोकांची उपजीविका अबाधित राहण्यास मदत होईल.
यामुळेच बंगाली तणमोराचे संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे.

Dubai sky transforms to green viral video
बापरे! हिरव्या रंगाचे ढग आले दाटून! पाहा, दुबईतील वादळाचा धडकी भरवणारा Video…
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?