‘‘पाव उटा जल्दी जल्दी.’’ असं म्हणत रेश्मा डोक्यावर पिठाचा डबा सावरत लगबगीने चालली होती. मागे छोटी रेहाना रेंगाळत चालत होती. मगरीबची (तिन्हीसांजा) वेळ झालेली. घरात पिठाचा कण नव्हता.

अम्मीसोबत ती चिंचा फोडायला गेली होती. तिथून यायला उशीर झाला होता. भूक तर लागलेली, पण काम तर केलंच पाहिजे. अब्बा मालकाची गाडी घेऊन मार्केटला गेलेत.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Sonam Wangchuk
“मी पुन्हा येईन!” २१ दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण घेतलं मागे, मोदी आणि शाहांचं नाव घेत म्हणाले…
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

रेश्मा लगबगीने चालत होती.

अम्मी आता मारणार. गिरणीवाला तात्या लवकर दळत नाही. पीठ पण मोठं देतो.

‘‘उसके गिरणी में जरा सस्ता पडता रे.’’ असं म्हणून अम्मी तात्याची पाठराखण करी. तात्या जगापेक्षा दोन रुपये कमीच घ्यायचा. परवडायचं. रेश्मा विचार करत चाललेली. ११ वर्षांची रेश्मा. पाचवीत शिकत होती, पण नावालाच.अधूनमधून ती शाळेत डोकावून यायची. शाळेत जाऊन बसणं तिच्या जिवावर यायचं. त्यापेक्षा अम्मीबरोबर कामाला जायला आवडायचं तिला. चिंचा फोडण्यात तर तिचा कुणी हात धरायचा नाही. पण लहान म्हणून मालक पन्नासभर रुपयेच हातावर टेकवायचा. रेश्मा लय चिडायची.

‘‘मेरे पैसे खातंय.’’ असं म्हणता म्हणता ती जागेवर थांबली. रेहानाचा रडण्याचा आवाज आला तसं तिने मागे वळून पाहिलं. रेहाना रस्त्याच्या कडेला पसरलेल्या खाडीवर फतकल घालून बसली होती. रेश्माकडे पाहात पाहात तिनं भोकाड पसरलं होतं.

‘‘क्या हुवा री?’’ एक तर उशीर झालेला, त्यात हिची ही नाटकं.

‘‘मजे लग्या.’’ रेश्माने पाहिलं तर खरंच रेहानाला लागलं होतं. गुडघा फुटला होता. रक्त बघून ती गडबडून गेली. घाबरली. अन् या भीतीपायी डोक्यावरचा पिठाचा डबा खाली पडला. रेश्माच्या काळजात धस्स झालं.

‘‘आता काय करायचं?’’

‘‘अगं अगं काय केलं हे ? डबा सरळ कर. आणि वरवरचं पीठ उचलून घे. काही होत नाही.’’ रस्त्यावरून जाणाऱ्या कुणीतरी तिला सुचवलं. ती सावध झाली. डबा सरळ केला. वरवरचं पीठ उचलून घेऊ  लागली.

‘‘खालचं नको घीव. माती अन् खडी मिसळल त्यात.’’ आसपासची माणसं सांगत होती.

रेहाना रडणं विसरून गेली होती. तीही आता पीठ भरत होती. दोघी पीठ भरत होत्या, पण डोक्यात मात्र विचार सुरू होता.

‘अम्मीला काय सांगायचं?’ कारण आधीच घरात नावालाही अन्न नाही. जे पीठ होतं तेही सांडलं.

रेहानाला लागलं म्हणजे तिची पट्टी-दवा आली. कुठून आणायचे पैसे?

रेश्माला रेहानाला मारावं असं वाटत होतं. तिच्यामुळे झालं सर्व. पण आता मारूनही फायदा नव्हता.

अम्मीला खरं कारण सांगू आणि आपणच मार खाऊ . आपलीच चूक झाली असं सांगू. तिने मन घट्ट केलं. दोघी घरी आल्या. रेहानाही काय कारण सांगून मार वाचवता येईल याचाच विचार करत होती. रेश्माने पिठाचा डबा घरात ठेवला व हातपाय धुवायला मोरीत गेली.

‘‘रेश्मे, आट्टा कम कैसा आया गे?’’ अम्मीचा चिडलेला आवाज आला. आत्ता रेहाना सगळं सांगणार आणि आपल्याला पाठ शेकुस्तोवर मार बसणार. रेश्मा घाबरत घाबरत घरात आली. ओढणीनं तोंड पुसत कोपऱ्यात सरकली.

‘‘मेरी गलती हाय. माझ्यामुळे सांडलं पीठ. दीदीचा काय दोष नाय.’’ बारकी रेहाना बोलायला लागली. तिने अम्मीला सगळी हकीगत सांगितली.

‘‘आम्मे, उद्याच्या कामाच्या पैशातनं गहू आणून देती. पन रेहानाला काय बोलू नको. छोटी हाय उने.’’ अम्मी आळीपाळीने दोघींकडे पाहात होती. एवढय़ा एवढय़ाशा या पोरी, पण किती शहाण्या झाल्यात. अम्मीला कौतुक वाटलं दोघींचं.

तिने रेहाना अन् रेश्माला जवळ बोलावलं. डोक्यावरनं हात फिरवला. रेहानाचा मुका घेतला. गालावरनं हात फिरवून बोटं कानशिलावर कडाकडा मोडली. ‘‘गुना के बच्चे मेरे.’’ असं म्हणत तिने पदरानं डोळे पुसले अन् स्वयंपाकाला लागली. या दोघी रोटी कधी बनते याची वाट पाहात होत्या. गरम गरम रोटी दोघींनाही आवडत होती. अम्मी पोरींकडे पाहात भराभरा हात चालवत होती. आजची रोटी नेहमीपेक्षा जास्त गोड लागणार असं तिला वाटलं अन् घामानं चेहरा ओथंबलेला असतानाही तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं.

फारुक एस. काझी farukskazi82@gmail.com