‘‘आ जी, कुठे गेली होतीस तू? घरात कोणीच नव्हतं. मला इतका कंटाळा आला,’’ दार उघडतानाच रतीने नाराजी व्यक्त केली.
‘‘अगं, मी विवेकानंद केंद्रात गेले होते. विवेकानंदांवर कीर्तन होतं आज,’’ उघडय़ा दारातून आजीबरोबर गौरांगी, गंधार, विराज, आर्यमान, ध्रुवी हे रतीचं मित्रमंडळही आत घुसलं.
‘‘आजी, कीर्तनात गोष्ट सांगतात असं तू म्हणाली होतीस. मग आम्हाला सांग ना तिथे काय सांगितलं ते,’’ रतीने मागणी करताच सगळ्यांनी खुशीत माना डोलावल्या. ‘‘हो, सांगणारच आहे मी तुम्हाला विवेकानंदांच्या बालपणीच्या गोष्टी. पण त्याआधी त्यांचं पूर्ण नाव काय होतं सांगा बघू. ’’
‘‘नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त,’’ रतीने घाईघाईने सगळ्यांच्या आधी सांगून टाकलं. कारण आजीने दिलेला विवेकानंदांचा फोटो तिने फ्रिजवरच चिकटवून त्याच्याखाली संपूर्ण नाव लिहून ठेवलं होतं.
‘‘तर या स्वामी विवेकानंदांचा जन्म कोलकाता येथे १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी. विश्वनाथबाबू उच्च न्यायालयात विधिज्ञ म्हणून प्रसिद्ध होते बरं का! हे दत्त कुटुंब गर्भश्रीमंत, दानशूर, धार्मिक, बुद्धिनिष्ठ, सुसंस्कृत, स्वाभिमानी आणि विद्येचे उपासक म्हणून ओळखले जाई. आई छोटय़ा नरेंद्रला रामायण -महाभारतातील गोष्टी सांगत असे. खटय़ाळ असला तरी नरेंद्रला आध्यात्मिक गोष्टी, साधुसंत यांचे आकर्षण होतं. खेळत असताना तो भगवान श्रीराम, सीता, शिव अशा देवतांच्या मूर्तीची पूजा करत असे.’’
‘‘मी छोटा असल्यामुळे आईच्या कडेवर बसून पूजा करतो, तसंच का गं?’’, विराजला खात्री करून घेतल्याशिवाय चैन पडेना.
‘‘हो रे हो. असेच एकदा मित्र पूजा करायला बसले असताना बाजूने साप वळवळत गेला. सगळेजण घाबरून घरी पसार झाले. नरेंद्र मात्र डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. खूप वेळाने आईने हाक मारल्यावर तो भानावर आला. अरे, तुमचीही सर्वाची समाधी लागली काय?’’
सगळेच आजीचं बोलणं ऐकण्यात गुंग झाले होते.
‘‘तुम्हाला ‘मी मोठेपणी कोण होणार?’ या विषयावर शाळेतल्या बाई निबंध लिहून आणायला सांगतात ना, तसंच एकदा नरेंद्रच्या वडिलांनी सगळी मुलं खेळत असताना त्यांना विचारलं. स्वत:च्या वडिलांप्रमाणे वकील, डॉक्टर होणार, असं एकेकाने सांगितलं. नंतर नरेंद्रची पाळी आली. तो एकटक भिंतीवर लावलेल्या, रथाचे सारथ्य करणाऱ्या कृष्णाच्या फोटोकडे बघत होता. ‘मी तर कोचमन होणार’, तो एकदम म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून विश्वनाथ बाबू अजिबात रागावले नाहीत. ते म्हणाले, ‘तू जरूर कोचमन हो, पण त्या कृष्णासारखा हो.’ भविष्यवाणीच जणू त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होती.’’ हे ऐकून स्फुरण आल्यामुळे गंधारची रिक्षा मात्र आवाज करत फिरू लागली.
‘‘आजी, आणखीन सांग नं,’’ गंधारची रिक्षा थांबवत आर्यमान हळूच म्हणाला, ‘‘दत्त कुटुंबातील संस्कारांचा परिणाम झाल्यामुळे छोटय़ा नरेंद्राला दीनदुबळ्यांचा कळवळा येत असे. गरजू, गरीब मुलांना तो आपले नवे कपडे पटकन् देऊन टाकत असे. म्हणून त्याला एकदा चक्क घरात कोंडून ठेवलं होतं. त्यातही नेमकं त्याचं लक्ष थंडीने कुडकुडणाऱ्या भिकाऱ्याच्या मुलाकडे गेलं. त्याने खिडकीतूनच त्याच्याकडे कपडे टाकले. असा होता छोटा नरेंद्र, आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा विचार करणारा. आता पुढची गोष्ट ऐकायच्या आधी आजीला पाणी कोण देणार? की स्वत:च आधी पिणार?’’
आजीचं बोलणं कळल्यामुळे ‘हे गं काय आजी?’ म्हणत रतीने आजीबरोबर सगळ्यांना आधी पाणी दिले.
‘‘लहानपणापासून नरेंद्र जिज्ञासू होता. कोणत्याही गोष्टीतील खरेखोटेपणा तो पडताळून पाहात असे. एकदा एका वृद्ध माणसाने त्याला म्हटले की ‘या झाडावर कधी चढू नकोस. जर चढलास तर झाडावरचे भूत तुला खाऊन टाकेल.’ नरेंद्रने ऐकले मात्र, दिवसभर अगदी काळोख पडेपर्यंत स्वारी झाडावरच बसून राहिली. खरोखरच भूत आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी, असं प्रत्येकाने धीट व्हायला हवं, खरं ना!’’
‘‘मी मोठा झाल्यावर कशालाही घाबरणार नाही,’’ विराजने झटकन सांगून टाकलं. ‘होऽ का?’ गंधारने चिडवताच थोडीशी हास्याची खसखस पिकली.
‘‘दत्त कुटुंब रायपूरला राहात असतानाची गोष्ट. मालमत्तेवरून गप्पागोष्टी चालल्या असताना एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून नरेंद्रने आपल्या वडिलांना विचारले की, आपण माझ्यासाठी कोणती मालमत्ता जमवून ठेवली आहे. विश्वनाथ बाबूंनी छोटय़ा नरेंद्रला आरशासमोर उभे केले आणि सांगितले, ‘तू तुझ्या प्रतिमेकडे बघ, सुदृढ, सशक्त शरीर, तेजस्वी डोळे, निर्भय मन आणि तल्लख बुद्धी या सर्व गोष्टी मी तुला दिलेल्या आहेत.’ आणि बरं का मुलांनो, आनुवंशिकतेने मिळालेला आरोग्याचा वारसा, गुरू रामकृष्ण परमहंसांकडून मिळालेला आध्यात्मिक वारसा याच्या बळावरच, ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे तत्त्व स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर अंगीकारले. जेमतेम ३९ वर्षांचे लाभलेले आयुष्य त्यांनी राष्ट्रकार्यासाठी वेचले. आज त्यांची १५०वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख करून घेणे व ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा,’ हे कृतीत आणणे, हे तुम्हा आम्हा सर्वाचंच काम आहे, खरं ना!’’
भारावलेल्या मुलांनी बाजूलाच असलेलं विवेकानंदांचं पुस्तक तत्परतेने उघडलं. आजीला हेच तर हवं होतं.