माझ्या वाचक दोस्तांनो, जसजसं आपण ध्रुवांच्या जवळ जाऊ  तसतशी थंडी वाढत जाईल. मात्र, या थंड वातावरणातही जीवन बहरताना पाहायला मिळेल. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांचे प्रदेश थंड सागरी तापमान, बर्फाने आच्छादित सागर आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आढळणारं दिवसरात्रीचं पराकोटीचं चक्र या वैशिष्टय़ांकरता ओळखले जातात. या वैशिष्टय़ांमुळेच इथल्या पारिस्थितिक संस्था फक्त ध्रुवीय प्रदेशांमध्येच आढळतात.

अतिथंड ध्रुवीय समुद्रांमधील विकसित जीवसंस्थांमध्ये समुद्री बर्फामध्ये आढळणारी शैवाल आणि डायॅटम पहायला मिळतात. या प्रमुख आणि प्राथमिक अन्नावरच ध्रुवीय प्रदेशातल्या बर्फाळ- थंड महासागरांमध्ये विपुलतेने आढळणाऱ्या क्रिलसारख्या प्रजाती पोसल्या जातात. क्रिल करंदीसमान, जवळजवळ पारदर्शक, प्राणिप्लवक प्रजाती आहे. अवाढव्य आकाराच्या व्हेल अर्थात देवमाशांच्या- जसे ब्लू व्हेल, राइट आणि फिन व्हेल- आहारामध्ये क्रिलचाच प्रामुख्याने समावेश असतो. या क्रिलचं आगळवेगळं वैशिष्टय़ म्हणजे अन्नाअभावी हे कित्येक महिन्यांपर्यंत तग धरतात; प्रयोगशाळेमध्ये तर तब्बल २०० दिवस हे अन्नाविना जिवंत राहिल्याचं आढळलं आहे.

ध्रुवीय महासागर खरोखरच इतर महासागरांपेक्षा निराळे आणि कमालीचे वैविध्यपूर्ण आहेत. या महासागरामध्ये पृथ्वीवरचा सर्वात मोठा अपृष्ठवंशीय प्राणी- अर्थात जायंट स्क्वीड नांदतात. साल २००७ मध्ये सापडलेला एक जायंट स्क्वीड तब्बल तीस फूट लांब आणि ५०० किलोग्रॅम वजनाचा होता.

(छायाचित्र सौजन्य : ऑएस्टीन पॉल्सन क्रिएटिव्ह कॉमन्स, शेअर अलाईक ३.०, विकीमिडीया कॉमन्स)

ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद