भारतीयांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी प्रचंड भीती असते. ही भाषा आपल्याला येणारच नाही असा गैरसमज करून घेतल्याने एक प्रकारचा न्यूनगंडही अनेकांच्या मनात असतो. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादाची प्रमुख भाषा असल्याने प्रत्येकाने ती आत्मसात करणे गरजेचे ठरते. अर्थात तरी अनेकजण तिच्यापासून शक्यतो दूर राहण्याचाच प्रयत्न करतात. सर्वसामान्यांना अवघड वाटणाऱ्या या इंग्रजी भाषेवर हुकूमत गाजवून तिचे देशविदेशात धडे देण्याची कामगिरी केलीय अकोल्यातील सचिनने. सचिन म्हटले की आपल्याला आठवतो भारताचा विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर हे क्रिकेट विश्वासाठी दैवतच. तसाच अकोल्यातील इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी दैवत ठरला आहे सचिन बुरघाटे. सचिन तेंडुलकरने ज्या प्रकारे चौकार आणि षटकार मारून भारताला अनेक क्रिकेट सामने जिंकून दिले, त्याच प्रकारे अल्पावधीत सचिन बुरघाटे याने हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात इंग्रजी भाषा रुजविली. ५०० लोकवस्तीच्या खेडय़ातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या सचिनने आतापर्यंत ४५ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देऊन शिक्षणक्षेत्रात ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला. केवळ इंग्रजी भाषेपुरतेच सीमित न राहता मानवविकासाकरिता ‘अस्पायर’ होऊन केलेल्या कार्यामुळे हा तरुण आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय!

शिकण्याची जिद्द, आत्मविश्वास आणि त्यास मेहनतीची जोड असल्यास काहीही साध्य होऊ शकते, हे अकोल्यातील या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या संवादकौशल्याच्या माध्यमातून आजवर विविध देशांतील सव्वाचार लाखांहून अधिक लोकांशी त्याने संवाद साधलाय. सध्या यशोशिखरावर असलेल्या सचिनच्या जीवनाचा प्रवास मात्र अत्यंत कठोर संघर्षांचा आणि खडतर असाच होता. परंतु आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने जीवनातील सगळ्या समस्यांवर मात केली. अकोला जिल्ह्य़ातील दुर्लक्षित अशा लाडेगाव या छोटय़ा गावात सचिनचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. अल्पभूधारक पालक शेतमजुरी व किराणा दुकान चालवून कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवीत होते. कुटुंबातील कुणालाही शिक्षणाचा गंध नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सचिनने चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर उमरा गावातील शाळेत त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. दहावीत ५२.६६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सचिनला आठवीपासून खऱ्या अर्थाने शिक्षणाची गोडी निर्माण झाली. दहावीनंतर शिक्षण सोडून घरचे किराणा दुकान सांभाळून आपल्या लहान भावाला शिकवावे, असा प्रस्ताव सचिनपुढे त्याच्या वडिलांनी ठेवला. शिक्षणाची गोडी लागलेल्या सचिनने दुकान सांभाळत तालुक्याच्या ठिकाणी वाणिज्य शाखेतून अकरावी व बारावीचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला. बारावीत असताना घटक चाचणीत एका विषयात वर्गातून प्रथम आलेल्या सचिनवर झालेला कौतुकाचा वर्षांव त्याच्या जीवनासाठी खऱ्या अर्थाने ‘टर्निग पॉइंट’ ठरला.

Punjab Kings vs Mumbai Indians match updates in marathi
PBKS vs MI : रोहित शर्मा रचणार इतिहास, एमएस धोनीनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार दुसरा खेळाडू
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली

त्यानंतर बारावीत ७५.७६ टक्के गुण मिळवून सचिनने उच्चशिक्षणाची वाट धरली. स्वयंशिक्षणाने त्याने अवघड वाटणारी इंग्रजी भाषाही आत्मसात केली. शालेय वयापासूनच त्याला या भाषेचे आकर्षण वाटे. सतत आपल्यातील कौशल्यांचा विकास करत त्याने इंग्रजीवर चांगलेच प्रभुत्व मिळवले. पुढे डी. एड. करून त्याने शिक्षक व्हावे अशी वडिलांची इच्छा असताना ‘फायनान्स’मध्ये करिअर करण्याचे त्याने ठरवले. त्यामुळे सर्वप्रथम वडिलांपुढेच स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर उभे ठाकले. पुढील शिक्षणाकरता लागणारा पैसा गाठीशी नसल्याने इंग्रजी भाषेलाच आपल्या शिक्षणाचा आधार बनवत सचिनने खासगी शिकवण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवून बी. कॉम. व एमबीएची पदवी मिळवली. पुण्यात एमबीए करत असताना एक वेळच्या जेवणावर त्याला दिवस काढावे लागले. दर गुरुवारी संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरातील महाप्रसादावर तो कसेबसे आले दिवस ढकलत होता. एमबीए पूर्ण झाल्यावर एका कंपनीच्या केपीओमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्याने दुसरीकडे कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून नोकरी पत्करली. आणि अवघ्या दीड वर्षांत त्याला पदोन्नती मिळून तो ब्रॅँच मॅनेजर आणि एरिया डेव्हलपमेंट मॅनेजर झाला. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर हातात थोडाफार पैसा आला तेव्हा एका गुरुवारी पुण्यातील त्याच संत श्री गजानन महाराज मंदिरात स्वत: अन्नदाता म्हणून त्याने महाप्रसादाचे वाटप केले. त्यावेळी सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

आणि इथूनच त्याच्या समाजऋण फेडण्याच्या कार्याची सुरुवात झाली. पुण्यातील नोकरीत त्याला समाधान मिळत नव्हते. ही नोकरी करत बसण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांचा कौशल्यविकास करण्याचा पेशा का पत्करू नये, हा विचार सचिनच्या मनात घर करून बसला होता. १५ ऑगस्ट २००९ ला इंग्रजी भाषा प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उतरायचे ठरवून त्याने आपल्या जिल्ह्य़ातच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देण्याचा निश्चय केला आणि थेट अकोला गाठले.

हातात भांडवल नव्हते, जागा नव्हती. अशा विपरीत परिस्थितीतही मित्र, शिक्षक व कुटुंबीयांच्या सहकार्याने ५ सप्टेंबर २००९ ला १६ विद्यार्थ्यांसह इंग्रजी भाषा प्रशिक्षणाला सुरुवात केली. आणि काही महिन्यांतच ‘अस्पायर’ ही संस्था नावारूपाला आली. विदर्भातील अकोला जिल्ह्य़ात देशातील इंग्रजी भाषा प्रशिक्षणाचे अव्वल केंद्र सुरू करण्याची किमया सचिन बुरघाटेने अवघ्या तिशीत करून दाखविली. अस्पायर संस्थेच्या माध्यमातून असंख्य तरुणांना उत्तम भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या सचिनने व्यवसाय आणि सामाजिक भान यांचे संतुलन सांभाळत अनेकांसाठी आदर्श उभा केला. ‘अस्पायर’ प्रशिक्षण संस्था सुरू करून त्याने तरुणांना इंग्रजी भाषा शिकण्याकरता आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडविण्याकरता मोलाचे साहाय्य केले. आज ही संस्था अकोल्यात इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स आदी विषयांचे प्रशिक्षण देते. वर्षांकाठी दहा हजारावर विद्यार्थी, व्यावसायिक, महिला, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी विविध विषयांचे धडे गिरवतात. अगदी आठ वर्षांच्या मुलापासून ते ८४ वर्षांच्या आजोबांपर्यंत एकाच घरातील विविध वयोगटातील तीन पिढय़ांचे लोक इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ‘अस्पायर’ची वाट धरतात. ‘अस्पायर’ ही भारतातील सर्वात मोठी अशैक्षणिक अभ्यासक्रम चालविणारी संस्था असल्याचे सचिन बुरघाटे म्हणतो. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून ‘अस्पायर’मध्ये विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. नोकरीसाठी मुलाखत, संभाषणकौशल्य, इंग्रजी संभाषण आदी करीअरशी संबंधित अनेक पैलूंसंबंधी येथे प्रशिक्षण दिले जाते. परदेशी तज्ज्ञ प्रशिक्षकांचेही  विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन मिळते. कॅनडा आणि जर्मनीतील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी येथे मार्गदर्शन केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांना सिंगापूर व थायलंडला पाठवून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षण दिले.

सेवाक्षेत्रात यश मिळवण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवेशिवाय पर्याय नाही, हा यशाचा मंत्र मानून सचिन गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय ख्यातीचा व्याख्याता म्हणून अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. ३०-३५ विषयांवर देशविदेशात तो हिंदी व इंग्रजीतून व्याख्याने देत असतो. त्याला विद्यार्थीदशेपासूनच व्याख्याने देण्याची आवड होती. श्रवणकला आत्मसात केल्यामुळेच आपण वक्ता म्हणून प्रभावी ठरू शकलो, असे तो म्हणतो. व्यक्तिमत्त्व विकास करण्यासोबतच मानवविकासावर त्याचा भर असतो. मानवविकासाच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडते असा त्याला विश्वास आहे. स्वप्नं उराशी बाळगून ती प्रत्यक्षात येण्यासाठी झगडल्यामुळेच यशाला गवसणी घालण्यात सचिन बुरघाटेला यश आले आहे.
lr11

सचिन बुरघाटेच्या या व्यावसायिक यशाला सामाजिक कार्याचीही किनार लाभली आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्याने आपले हे व्रत सुरू ठेवले आहे. दरवर्षी दिवाळीला तो गरीब व अनाथ मुलांना दिवाळीचा फराळ व नवीन कपडे देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवत असतो. आमटे कुटुंबाच्या हेमलकसा व आनंदवनात विद्यार्थ्यांना घेऊन जाणे आणि तिथे त्यांना समाजसेवेचे बाळकडू पाजण्याचा उपक्रमही तो राबवतो. एचआयव्हीग्रस्त मुलांना शिकवण्यासोबतच संस्थेत दानपेटी ठेवून त्या पेटीतील निधीतून या मुलांना औषधे, गरजूंना पुस्तके पुरविली जातात. या मुलांना संगणकीये ज्ञान मिळावे म्हणून अस्पायरने संगणकही उपलब्ध करून दिला. काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वही सचिनने स्वीकारले आहे. अंध मुले आणि वृद्धांना चित्रपटगृहात नेऊन त्यांना चित्रपटाचा आनंद लुटू देण्याचे काम तो करतो. आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे, तसेच गावातील शाळेत डिजिटल क्लासरूम सुरू करण्याचे दायित्वही त्याने उचलले आहे. सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या पुरस्कारातून त्याने माझोड या गावात लोकसहभागातून उभारलेल्या ग्रंथालयाला पुस्तके व ग्रंथ देऊन समृद्ध केले. जगाने तुम्हाला मोठे केले. आता जगाला तुम्ही काहीतरी दिले पाहिजे, ही भावना उराशी बाळगून सामाजिक कार्यार्थ झटण्याचा संकल्प सचिनने सोडला आहे. त्यातून अनेकांना सचिन बुरघाटे नावाचा आधारस्तंभ लाभला आहे.

prabodh.deshpande@expressindia.com

dinesh.gune@expressindia.com