स्पर्धेच्या चौथ्या आठवडय़ातील विजेत्याची भावना
महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी ‘लोकसत्ता’तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमामुळे आम्हा तरुणांना विचाराचे नवे व्यासपीठ मिळाले असल्याची भावना या स्पध्रेच्या चौथ्या आठवडय़ातील विजेता जयेश खामकर याने व्यक्त केली. भवतालच्या सामाजिक प्रश्नांचा सर्व बाजूंनी विचार करण्याची सवय त्यामुळे लागत आहे, असेही त्याने नमूद केले.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील लांजा येथील जयेशला ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘उद्यमारंभ आणि आरंभशूरता’ या अग्रलेखावर लिहिलेल्या सवरेत्कृष्ट ब्लॉगबद्दल प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेच्या (आयडॉल) रत्नागिरी विभागात जयेश प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत आहे. या ब्लॉगमध्ये त्याने केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’ योजनेचे स्वागत करतानाच अंमलबजावणी कार्यक्रम नियोजनाअभावी विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने या सर्व परस्परपूरक योजनांचा मिलाफ करून सर्वसमावेशक कृती कार्यक्रम राबवणे प्राप्त परिस्थितीत सरकारसाठी श्रेयस्कर ठरेल, असे मत नोंदवले आहे.

‘ब्लॉग बेंचर्स खूप शिकविणारे’
पुणे : ‘लोकसत्ता’मुळे वाचण्याची आणि विचार करण्याची सवय लागली. ते विचार व्यक्त करण्यासाठी ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ या स्पर्धेने दिलेले व्यासपीठही खूप शिकवणारे आहे’, या भावना द्वितीय क्रमांक पटकावलेल्या सागर गावंड याने मंगळवारी व्यक्त केल्या.‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ या स्पध्रेत पुण्यातील गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयातील सागर गावंड याला द्वितीय क्रमांक मिळाला. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. सागर हा द्वितीय वर्ष कला शाखेत शिकत आहे. शेतकरी कुटुंबातील सागर शिक्षणासाठी सोलापूरमधील मंगळवेढय़ातून पुण्यात आला आहे. सागर म्हणाला, पुढेही आवडीच्या विषयावर लिहित राहीन.