वर्षांची अखेर जवळ आलीय. रानभर – केवढा हा पाचोळा! जणू नवोदितांच्या चारोळ्या. पानांच्या या थारोळ्यात माझं निष्पर्ण मन गडप होईल तर बरं! भावना, संवेदना, वेदना, याचना, वंचना या सगळ्या भोवऱ्यात आपण आयुष्याचा वनवास उपवासासारखा काढतो. अनेकदा आपण एक स्वतंत्र ‘पेशी’ आहोत, हे आपला पेशा सांभाळताना आपण विसरूनच जातो. आता तर प्रत्येक व्यक्ती हे एक ‘माध्यम’ बनते आहे. कुणी कुणाचं ऐकून घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आसपास इतकी देवळं असूनही मी कधीच, कुठेच गेलो नाही. ज्ञानमंदिर माझ्या मनात होते. पूर्णवेळ लेखन करत घरीच असण्याचं स्वातंत्र्यसुद्धा मी पूर्वी पुरेपूर अनुभवलं आहे. समाधीचे जे निवांत क्षण मी अरण्यात अनुभवले त्यांनी माझं माणूसपण अधिक समृद्ध, सजग आणि टोकदार केलं. ईश्वर अस्तित्वात नाही याची खात्री मला रानीवनीच पटली. क्रौर्य, अन्याय, विसंगती यांचं ‘बळी तो कान पिळी’ पद्धतीचं थैमान जंगली पद्धतीने सुरू असतं. म्हणजे तुमच्या शहरांपेक्षा अरण्य काही वेगळं नव्हे. सोंगढोंग, कातडीबचाऊ धोरण, आईबहिणीची ओळख न ठेवणं, हक्कांचे बलात्कार, दुष्काळी तडफड, आत्महत्या, इच्छामरण, मधुर तरीही स्वार्थी कौटुंबिक जीवन, नैसर्गिक वात्सल्य, अनैसर्गिक पण तात्पुरते लैंगिक संबंध सगळं काही दाट जंगलात बघायला मिळतं. हळूहळू पानगळीचं जंगल निष्पर्ण होत जातं. तिथं कुणीही कुणाचं नसतं. नेतृत्वासाठी प्राणी प्राणघातक झुंज देतात. टोळीच्या प्रमुखाची एक इज्जत असते व ते पद मिळावं म्हणून तो हुज्जतही घालत असतो.

अशा घातपाती अरण्यात ‘व्यवस्थेचा’ चकवा लागू न देता, मी मुद्दाम मुक्त राहिलो. तुम्हाला व्यवस्थेत थोडं बहुत परिवर्तन जरी आणायचं असेल, तर तुमचा रंग वेगळा व पाय मोकळा असावा लागतो. सामान्य वनस्पती माझ्यावर फुलं उधळणार नाहीत, पण एखादा महावृक्ष मला सावली नक्की देईल. खळखळता जवान निर्झर मला भेटून जाईल. अविवाहित राहण्याचं, नास्तिक बनण्याचं, ‘व्यवस्था’ बहुतअंशी नाकारण्याचं, भ्रष्टाचार अजिबात न करण्याचं, जे पाच पैसे मिळाले ते माझ्यापेक्षा गरीब लोकांना देऊन समाजऋ णातून मुक्त होण्याचं, सत्यवादी विचारांचा प्रचार – प्रसार करण्याचं, कष्टांचा मोबदला हक्काने मागण्याचं, ज्या कला आपल्याकडे उपजत आहेत त्यांचा विकास करण्याचं असं नाना तऱ्हेचं स्वातंत्र्य मी उपभोगलं. व्यसनांनी पोखरलेले रिकामे ‘प्राणी’ नाना उचापती करून आपलं हे पारदर्शक स्वातंत्र्य खुडण्याचा, उकरण्याचा, भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी तर काजव्याच्या पिल्लासारखं आपण भूमिगत व्हावं असंही वाटू लागतं. डायनॉसोरची अंडी अचानक मिळावीत तशी तथाकथित प्रतिष्ठित लोकांची अंडीपिलीही मला कळलेली असतात. पत्रकारिता काही डोळ्याला पट्टी बांधून फिरत नाही. या सगळ्या कोलाहलात भारतीय समाजजीवन, प्रस्थापित व्यवस्था यावर विश्वास ठेवण्यासारखं फार काही उरत नाही हे एक कटू सत्य आहेच. मात्र, तरीही आपली सुंदर लेणी आपण खोदली पाहिजेत आणि कलावंताचं, विचारवंताचं म्हणून जे अभिजात अस्सल स्वातंत्र्य आहे, ते टिकवलंच पाहिजे!

केवळ ‘टरफलं’ ठरेल असं लेखन अनेक हौशी मंडळी केवळ त्यांच्याकडे पुस्तकं  पैदा करण्याइतका पैसा आहे म्हणून बापडय़ा माय मराठीत करत असतात. रद्दीचं दुकान माझ्या घरटय़ापासून अगदी चार पावलांवर आहे. त्यामुळे अशा वातड लेखनाचा एकगठ्ठा सोक्षमोक्ष आपोआप लागतो. वजनात हे वाङ्मय बरं भरतं. भंगार विकून, टाकून देण्याचं आपलं स्वातंत्र्यसुद्धा मौलिकच मानावं.

‘जिथे युनिफॉर्म असणार नाही अशाच ज्युनियर कॉलेजला मी प्रवेश घेईन’ असं मी आईला म्हटलं होतं. तेसुद्धा माझं फुलपंखी स्वातंत्र्यच होतं. त्याप्रमाणे मी ‘पार्ले कॉलेज’ला गेलो. जाडेभरडे कपडे गणवेश रूपात घालून ‘कॅम्पस’वर शिकायला जायचं असेल, तर त्यापेक्षा थेट वॉचमन व्हावं!

‘कल्पना कराव्या, पण वल्गना करू नये’

असं आमचे प्राध्यापक कॉम्रेड सदा कऱ्हाडे एकदा वर्गात म्हणाले होते. डॉक्टर कऱ्हाडेंची काही वाक्यं मी वहीत लिहून ठेवायचो. नंतर कुणीतरी माझी ती वहीच ढापली. सुविचार, सुभाषितांचीही चोरी होते हे मला प्रथमच कळलं.

शिशिरात सर्वसाधारणपणे पाखरं दुबळी होतात. मी मात्र हिवाळ्यात अधिक उमललो. माझं मनोबल विश्वासघात, फसवणूक, इतरांची दांभिकता, प्रेमभंग, विरलेली स्वप्नं, नश्वरतेची जाणीव यातूनच वाढत गेलं. किरकोळ वाटणारा आपला देह मुळात आपण नीट काळजी घेत सांभाळायचा असतो. स्वत:ला स्वीकारणं, स्वत:ला गोंजारणं, स्वत:ला तपासणं, स्वत:ला प्रकाशझोतात ठेवणं यासाठी माझे जे क्षण मी दिले, ते सार्थकी लागले असं वाटतं.

काटेरी बोरीबाभळी आसपास असल्या तरी मी मंद सुवास देणारा चाफा झालो. कर्मकांड, उत्सव याच्याशी माझा कधीच संबंध आला नाही. जेवणाच्या डब्यात उपासाचं अन्न पाहिल्यावर मला कळायचं की आज एकादशी आहे किंवा चतुर्थी आहे. मात्र भाविकांच्या भावनांचा मी कायम आदर केला. कारण तो त्यांचा एक आधार असतो व त्याबाबतीत साधी सज्जन माणसं फार प्रामाणिक असतात. ‘श्रद्धा’ हेसुद्धा एक आदरणीय मूल्य आहे. अंधाराचे बोगदे ओलांडताना श्रद्धास्वातंत्र्यही महत्त्वाचं मानावं लागेल!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com