मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत न मिळाल्यास कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केले आहे. मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. कुठलीही युती किंवा आघाडी न करता पक्ष यंदा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्व पालिका निवडणुकींमध्ये महत्त्वाची मानली जात आहे. सत्ताधारी शिवसेनेसमोर स्वबळावर सत्ता आणण्याचे आव्हान यंदा आहे. तर भाजपनेरी पारदर्शकतेचा नारा देत सत्ता काबिज करण्याचे मनसुबे ठेवले आहेत. मुंबई पालिकेची निवडणूक प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांच्या भोवतीच फिरत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निडवणूक प्रचारावेळी एकमेकांवर चिखलफेक केली. युती संपुष्टात आल्याची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे भविष्यात कोणाशीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठणे कठीण झाल्यास भाजपसोबत हात मिळवणी करणार का? असा प्रश्न मनोहर जोशी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना जोशी यांनी सूचक विधान केले. ‘जर-तर’च्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे?, असे सुरूवातीला जोशी म्हणाले. नंतर जोशींनी सेना-भाजप एकत्र येऊ शकतात किंवा कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकते, फक्त स्पष्टपणे कुणी तशी भूमिका मांडू शकत नाही, असे जोशी म्हणाले. जोशी यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम असल्याचेही जोशी यावेळी म्हणाले.