मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्षाला धार चढत चालली आहे. राज्य सरकारमधून सरकार बाहेर पडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ, असे काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सांगितले जात असतानाच आता रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी युतीसाठी मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, असे ते म्हणाले.

मुंबईचा महापौर आमचाच असेल, असे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. त्याचवेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. काँग्रेस नेत्यांच्या या ‘गुगली’मुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. तर शिवसेनेसोबत युती करून सत्ता स्थापन करण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यातून मिळत आहेत. त्याचवेळी भाजपसोबत युती करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दोन्ही पक्षांमध्ये युती व्हावी यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे.

शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन अडीच – अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे. दोन्ही पक्षांची युती व्हावी, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. युती व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे रामदास आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. शिवसेनेने इतर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेण्यापेक्षा भाजपसोबत युती करावी, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून युतीबाबतचा प्रस्ताव आल्यास मी नक्की विचार करेन, असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना -भाजप एकत्र आल्यास मोठी ताकद निर्माण होईल. मागील विधानसभा निवडणुकीत दोन्हीही पक्ष वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यानंतरही दोन्ही पक्ष एकत्र आले होते आणि राज्यात सत्ता स्थापन केली होती, असे सांगून मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील भाजप सरकार पडावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, असे नितीन गडकरी आज सकाळी म्हणाले होते. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतची वक्तव्ये त्यांच्या नेत्यांकडून का केली जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना एकत्र येऊन काम केले पाहिजे. दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याबाबतचा अंतिम निर्णय़ पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असेही नितीन गडकरी म्हणाले होते.