मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची निराशाजनक कामगिरी आणि गटबाजीचे आरोप या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा जास्त मराठी चेहऱ्यांना उमेदवारी देत मराठी मते काँग्रेसपासून दूर जाणार नाहीत याची खबरदारी घेतली होती. महापालिकेच्या वतीने २० रुपयांमध्ये पोटभर थाळी असे आश्वासनही काँग्रेसने दिले होते. मात्र त्यानंतरही मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे.काँग्रेसला निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत संजय निरुपम यांनी गुरुवारी दुपारी पदाचा राजीनामा दिला.

पक्षातील गटबाजी हेदेखील संजय निरुपम यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यातील वादाने मुंबई काँग्रेसमधील संघर्ष टोकाला गेला होता. निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून दूर राहण्याचा इशारा कामत यांनी दिला होता. त्यानंतर नारायण राणे यांनीही संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत मुंबईत काँग्रेसचा प्रचार करणार नाही असा पवित्रा घेतला होता.

निरुपम विरुद्ध अन्य नेत्यांमध्ये सुरु असलेला वाद थेट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला होता. सरचिटणीस गुरुदास कामत गटाकडून सुरू असलेल्या दबावतंत्राकडे निरुपम यांनी राहुल गांधी यांचे लक्ष वेधले होते. मुंबई काँग्रेसमध्ये उमेदवारांची यादी हा नेत्यांसाठी वादाचा विषय होता. प्रत्येक नेत्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी म्हणून आग्रह धरला आणि त्यातूनच गटबाजी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी होऊ शकली नाही असे म्हटले होते. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.