शिवसेना ८४, भाजप ८२.. मुंबईत महापौरपदासाठी दोन्ही पक्ष सरसावले

राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांचे गुरुवारी जाहीर झालेले निकाल पाहता भारतीय जनता पक्षाची लाट सर्वत्र दिसत असून, सात पालिकांमध्ये या पक्षाची सत्ता येईल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेने ८४, तर भाजपने ८२ जागा पटकावल्याने विलक्षण अटीतटीची स्थिती निर्माण झाली असून, आता स्वबळावर महापौरपद मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. सर्व पर्यायांची दोन्ही बाजूंकडून चाचपणी केली जात असून, काँग्रेस, राष्ट्रवादी व छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी संपर्कही साधण्यात आला आहे. दोघांनीही महापौर आमचाच, असा दावा केला असला तरी इतर पक्षांतील कोण, कोणती भूमिका घेतो यावर सारा खेळ अवलंबून असेल.

मुंबईसह दहा महापालिकांचे निकाल गुरुवारी लागले. त्यातील मुंबई पालिकेत शिवसेना सहज सत्ता मिळवेल, असे प्रारंभीचे चित्र होते, मात्र नंतर ते बदलत गेले आणि शिवसेना व भाजप यांच्यातील जागांचा फरक अवघा दोन इतका उरला. शिवसेनेला ८४ व भाजपला ८२ जागा मिळाल्या असून काँग्रेसला ३१, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, मनसेला ७ व इतरांना १४ जागा मिळाल्या आहेत. या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आले आहे. काँग्रेसने मदत करावी म्हणून शिवसेनेचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेसची द्विधा मनस्थिती झाली आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, असा प्रस्ताव असला तरी त्याचे देशभर अन्यत्र पडसाद उमटतील आणि अल्पसंख्यांकांच्या मतांवर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळेच काँग्रेसच्या पाठिंब्याकरिता शिवसेनेने त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचा महापौर आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असाही गर्भित इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि अपक्षांसह इतरांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांचा पाठिंबा मिळाला, तरी भाजपचे संख्याबळ ११२ वर जाईल. सर्वच अपक्ष व इतर भाजपच्या गळाला लागणे कठीण असल्याने हे गणित सोपे नाही. उलट शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला किंवा बाहेर राहून मदत केली, तरी काँग्रेसच्या ३१ जागा व काही अपक्षांची मदत मिळवून शिवसेनेचा महापौर आरामात निवडून येऊ शकतो. त्यामुळे महापौर कोणाचा बसणार, हे सर्वस्वी काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून राहील.

समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेत या पक्षाने शिवसेनेला मदत केली आहे. यामुळेच सपाची मदत होऊ शकते, असे शिवसेनेचे गणित आहे.

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात कायम भूमिका घेतली होती. निवडणुकीआधीही शिवसेना-काँग्रेस यांच्यात काही समझोता झाल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला होता.

या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सत्ता मिळविली तर भाजपकडून काँग्रेस-शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र भाजपने अन्य पक्षीयांच्या मदतीने आपला महापौर बसविला, तर मुंबईत शिवसेनेचा महापौर नाही, हे ठाकरे यांना कदापिही सहन होणार नाही. त्यावेळी ते राज्य सरकारचाही पाठिंबा काढण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

त्यामुळे राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपने शिवसेनेशी तडजोड करुन महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद वाटून घेण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे भाजपमधील एका गटाला वाटत आहे. मात्र शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्याची संधी चालून आली असताना ती वाया दवडायची का, असाही प्रश्न आहे. शिवसेनेने भाजपला सन्मानाची वागणूक दिली आणि महापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपदात समान भागीदारी दिली, तरच तोडगा निघू शकणार आहे. मात्र सध्या भाजप व शिवसेना स्वबळाचाच संघर्ष अधिक तीव्र करण्याच्या भूमिकेत आहेत. ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दोघांनीही महापौरपदावर दावा केला आहे. या दोन्ही पक्षांनी ११४चा आकडा गाठण्यासाठी सर्व पक्षांशी व अपक्षांशी चर्चाही सुरू केली आहे. संख्याबळाचे गणित मांडून भाजपचा महापौर बसवून दाखवून शिवसेनेला आव्हान देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ते झाल्यावरच शिवसेना चर्चेला तयार होईल, अशी खेळी करण्याचीही भाजपची रणनीती आहे. ठाकरे व शिवसेना यांनी आपले पत्ते उघडले नसून महापौर शिवसेनेचाच होईल, असे खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

भाजपमधील मतप्रवाह..

राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपने शिवसेनेशी तडजोड करून महापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपद वाटून घेण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे भाजपमधील एका गटाला वाटत आहे. मात्र शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्याची संधी चालून आली असताना ती वाया दवडायची का, असाही एका गटाचा प्रश्न आहे. शिवसेनेने भाजपला सन्मानाची वागणूक दिली आणि महापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपदात समान भागीदारी दिली, तरच तोडगा निघू शकणार आहे. मात्र सध्या भाजप व शिवसेना स्वबळाचाच संघर्ष अधिक तीव्र करण्याच्या भूमिकेत आहेत.

शिवसेनेचे हिशेब

शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला किंवा बाहेर राहून मदत केली, तरी काँग्रेसच्या ३१ जागा व काही अपक्षांची मदत मिळवून शिवसेनेचा महापौर आरामात निवडून येऊ शकतो.

भाजपचे गणित

काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांचा पाठिंबा मिळाला, तरी भाजपचे संख्याबळ ११२ वर जाईल. सर्वच अपक्ष व इतर भाजपच्या गळाला लागणे कठीण असल्याने भाजपसाठी हे गणित सोपे नाही.

कल्याण-डोंबिवलीचीच पुनरावृत्ती?

दीड वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड कटूता आली होती. तेव्हाही दोन्ही बाजूंनी महापौरपदासाठी रस्सीखेच करण्यात आली होती. पण संख्याबळाचे गणित जमत नसल्यावर भाजपने शिवसेनेशी जुळवून घेतले होते. काँग्रेसने कोणालाच पाठिंबा द्यायचा नाही, अशी भूमिका घेतल्यास उभयता एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता आहे.

काँग्रेसपुढे कोडे: भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, असा प्रस्ताव काँग्रेसपुढे असला तरी त्याचे देशभर अन्यत्र पडसाद उमटतील आणि अल्पसंख्यांकांच्या मतांवर त्याचा परिणाम होईल, अशी काँग्रेसला भीती आहे.