मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी सुरुवातीलाच भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा पारदर्शक होती. सभेला गर्दी झाली नाही म्हणून मुख्यमंत्रीही ‘पारदर्शक’ झाले, अशी तोफ त्यांनी मुख्यमंत्र्यांवर डागली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हे पुण्यामध्ये आले होते. बॉम्बेचे मुंबई केले तसे पुण्यातील मुळा, मुठा या नद्यांची नावे बदलावी, असे नायडू यांनी सूचवले. नद्यांची नावे बदलायची आणि त्यांचे नाव काय ‘गाजर’ ठेवायचे काय, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री  म्हणाले, ठाकरेंची देना बँक नाही तर लेना बँक आहे. पण त्यांनी ना लेना, ना देना बँक आहे, त्यांची केवळ नो अॅक्सिस बँक आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुंबईमध्ये शिवसैनिक असेपर्यंत शिवसेना सुरक्षित राहील असे ते म्हणाले. प्रत्येकाच्या कामासाठी, प्रत्येकासाठी शिवसैनिक सदैव झटत असतो. शिवसेना आणि जनतेच्या मधला दुवा शिवसैनिक आहे त्यामुळे जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेना सुरक्षित राहील आणि जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत मुंबई सुरक्षित राहील असे ते म्हणाले.

निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षामध्ये गुंडांचा प्रवेश झाला हे सर्व जनतेनी पाहिले. जर, आमच्या माता-भगिनीला तुमच्या गुंडांनी त्रास देण्याचा प्रयत्न तरी केला तरी त्या गुंडांचा हात उखडल्याशिवाय आमचा शिवसैनिक राहणार नाही असे ते म्हणाले. शिवसेनेला महापौर बंगला गिळंकृत करायचा आहे अशी टीका होत आहे. जर आम्ही भ्रष्टाचारी वाटत होतो तर मग आमच्याशी युती करण्यासाठी का पुढे आलात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला. शिवसेनेचा एकही नगरसेवक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडला असता, तर भाजपने थयथयाट केला असता. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भाजपचे मंत्री भ्रष्टाचाराने किती बरबटलेले आहेत ते सांगावे. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले आहेत. तरीही ते अजून थापाच मारत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर बाहेर गाजरवाटप केले जाते असे सांगितले असे ते म्हणाले. शरद पवार यांना पद्म पुरस्कार देऊ शकता मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आतापर्यंत भारतरत्न का दिले नाही? असा सवाल त्यांनी या सभेमध्ये केला.