सुरेंद्र बागलकर विरुद्ध अतुल शहा लढत

मतमोजणीमध्ये दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याचे उघड झाल्यानंतर ईश्वर चिठ्ठीच्या मदतीने प्रभाग क्रमांक २२० मधून भाजप उमेदवार अतुल शाह विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर केले. मात्र ही बाब खटकल्यामुळे याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानाच्या वेळी गोपनीय म्हणून राखून ठेवलेल्या पाच मतांचा (टेंडर व्होट) कौल घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २२० मधील शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि बेस्ट समितीचे अध्यक्षस्थान भूषविणारे सुरेंद्र बागलकर यांचा प्रभाग क्रमांक २१८ महिलांसाठी राखीव झाल्यामुळे शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक २२० मधून उमेदवारी देऊन पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. तर भाजपने ज्येष्ठ नेते अतुल शाह यांना उमेदवारी दिली. नव्या प्रभागात मुस्लीम मतदारांची संख्याही मोठी होती. त्यामुळे या दोघांपुढे मोठे आव्हान होते. मतमोजणीअंती अतुल शाह अत्यंत कमी मतांनी विजयी झाल्याची कुजबूज भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली.

मात्र अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकर यांना समसमान मते पडल्याची बाब शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र बागलकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सुरेंद्र बागलकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केली. त्यावेळीही दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याचे निदर्शनास आले.

दोन वेळा मतमोजणी केल्यानंतर दोन्ही उमेदवारांना समान मते असल्याचे निदर्शनास आल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि त्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता मुंबई सेंट्रल येथील मतमोजणी केंद्रावर रवाना झाले. ईश्वर चिठ्ठीने अतुल शहा यांच्या बाजूने निकाल दिला आणि सुरेंद्र बागलकर यांना पराभव पत्करावा लागला.

गोपनीय मतांचा नेमका प्रकार काय?

आपल्या नावावर भलत्याच व्यक्तीने मतदान केल्याचे लक्षात आल्यानंतर मतदारयादीत नाव असलेली व्यक्ती आपणच असल्याचे सिद्ध करणाऱ्या मतदाराने मतदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्याला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली जाते. मात्र त्याला मतदानयंत्राद्वारे मतदान करता येत नाही. तर त्याला मतपत्रिका दिली जाते आणि त्याचे मत एका लिफाफ्यात बंद केले जाते. अशा व्यक्तीचे मत गोपनीय ठेवले जाते आणि आवश्यकता वाटल्यास या मताची मोजणी केली जाते. मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक २२० मध्ये आपल्या नावावर भलत्याच व्यक्तींनी मतदान केल्याचे मतदान केंद्रावर आलेल्या पाच मतदारांच्या निदर्शनास आले. मात्र आपल्याला मतदान करण्याची इच्छा या पाच जणांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना मतपत्रिकेच्या माध्यमातून गोपनीय मतदान करण्याची संधी देण्यात आली. या पाच जणांची मते लिफाफ्यामध्ये सिलबंद करण्यात आली आहेत. केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार या मतांचा कौल घेता येतो. त्यामुळे या मतांचा कौल घेण्यासाठी शिवसेनेने न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.