मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या ‘खेळी’वरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील भाजप सरकार पडावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला असून त्यापाठोपाठ भाजपच्या जागा निवडून आल्या आहेत. निकालानंतर भाजप आणि शिवसेनेकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. तर शिवसेनेने कुणासोबत सत्तेत बसायचे यासाठीचे पर्याय राखून ठेवले आहेत. मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळावा, अशी शिवसेनेची इच्छा असल्याचे सूत्रांकडून समजते. तर काँग्रेसने पाठिंबा दिल्यास त्यांना उपमहापौरपद दिले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच शिवसेना देवेंद्र फडणवीस सरकारशी ‘नाते’ तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेचे नवीन समीकरण तयार करू शकतात, अशा चर्चांनाही ऊत आला आहे. त्यात मुंबईत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीरपणे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे भाजपने संताप व्यक्त केला असून, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट काँग्रेसवर ‘राग’ व्यक्त केला आहे.

काँग्रेसला राज्यातील भाजपचे सरकार पाडायचे आहे, असे वाटते. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतची वक्तव्ये त्यांच्या नेत्यांकडून का केली जात आहेत, असा सवाल नितीन गडकरी यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याबाबतचा अंतिम निर्णय़ पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असेही नितीन गडकरी म्हणाले. गडकरी यांनी याआधीही शिवसेना-भाजपने एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. दोन्ही पक्षांकडे एकत्र येण्याशिवाय़ दुसरा कोणताही पर्याय नाही, असे ते म्हणाले होते.