भाजपकडून मुंबई महानगरपालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या ११४ उमेदवारांच्या यादीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. आज रात्री भाजपकडून ही यादी शिवसेनेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे समजते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याबाबत आशिष शेलार यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्र्यांनी या यादीला हिरवा कंदील दाखविल्यामुळे भाजपचा समान जागांचा आग्रह कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापूर्वी भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काही निष्पन्न झाले नसल्याचे दिसत आहे.
शिवसेना भाजपसाठी ९५ ते १०० च्या आसपास जागा सोडण्यास तयार आहे. मात्र, भाजपकडून विधानसभेत मिळालेल्या यशाच्या आधारावर जागावाटप करावे, असा आग्रह धरण्यात आला आहे. या सूत्रानुसार, ज्याठिकाणी संबंधित पक्षाचा आमदार असेल तेथे त्या पक्षाला जास्तीत जास्त जागा देण्यात याव्यात. त्यानंतर उर्वरित मतदारसंघासाठी पुन्हा समान जागावाटप करावे, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना यासाठी तयार नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे १७१:११७ असं जागावाटपाचे सूत्र ठरले होते. मात्र लोकसभेच्या यशानंतर भाजपने ५०:५० म्हणजे १४४:१४४चा दावा केला होता. पण शिवसेनेने आधीच १५० ची घोषणा केली होती. त्यामुळे अवघ्या पाच ते सहा जागांवरून युतीची बोलणी फिस्कटली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता महापालिका निवडणुकीतही होते की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

भाजपला युतीमध्ये फारसे स्वारस्य नाही. पण युतीची चर्चा आम्ही केली आणि पारदर्शी कारभाराचा आग्रह मान्य न केल्याने शिवसेनेने युतीस नकार दिला, अशी वातावरणनिर्मिती भाजपला करावयाची आहे. भाजपची पारदर्शी कारभाराची अट मान्य केली, तरीही सध्याचा शिवसेनेचा कारभार भ्रष्ट असल्याची कबुली दिल्यासारखेच होईल आणि आमच्या अटींवरच शिवसेनेला युती मान्य करायला लावली, असा प्रचार करण्याची मेख भाजपने मारून ठेवली आहे.