मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक संपली आहे. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीनंतर शिवसेनेसोबतच्या युतीबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

शनिवारी झालेल्या युतीबद्दलच्या तिसऱ्या बैठकीत शिवसेनेकडून भाजपला ६० जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. भाजप ११४ जागा लढवण्याच्या तयारीत असताना शिवसेनेने भाजपसाठी फक्त ६० जागा सोडण्याची तयारी दर्शवली. यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच आता युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीबद्दलचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे सोपवण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते आणि ‘सामना’च्या मुखपत्रातून केली जाणारी टीका आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेला फक्त ६० जागांचा प्रस्ताव यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे. युतीबद्दलची बोलणी सुरू होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबद्दलचा निर्णय घेतील, असे सांगण्यात आले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी पुढाकार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, विद्या ठाकूर यांच्यासह इतर आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.