काँग्रेसचा मराठीतून प्रचार

एकीकडे शिवसेनेने अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार मोहिमांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला असताना काँग्रेसने मात्र सेनेला मराठीतून प्रत्युत्तर दिले आहे. सेनेच्या ‘डीड यू नो’ला सामाजिक माध्यमाद्वारे उत्तर देतानाच काँग्रसने आता ‘मन बदला मुंबई बदलेल’ या घोषवाक्यांची मालिका सुरू केली आहे.

पालिकेच्या निवडणुका महिनाभरावर आल्याने सर्वच पक्षांनी प्रचार मोहिमा वेगाने सुरू केल्या आहेत. शिवसेनेने ‘डीड यू नो’च्या माध्यमातून मराठी अस्मितेला सोडचिठ्ठी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने मात्र सामाजिक माध्यमांवर ‘डीड यू नो’च्या हॅशटॅगमधून रस्ते, नाले भ्रष्टाचारावर बोट ठेवले. त्याचवेळी पालिकेतील घोटाळे आणि रखडलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दहा भागांची मालिका तयार केली आहे.

रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांमधील कचरा, अपुरा पाणीपुरवठा, रुग्णालयांची दुरवस्था आदी विषयावर ‘हे ‘पाप’ महापालिकेतील भ्रष्ट अभद्र युतीचे’ या घोषवाक्याने ही छायाचित्रे आणि दृकश्राव्य मालिका वृत्तपत्रे, टीव्ही आणि सामाजिक माध्यमातून लोकांसमोर आणली जातील, असे मुंबई काँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी सांगितले. गेली २० वर्षे सत्तेत राहूनही काही झालेले नसताना तसेच पाच वर्षांपूर्वीच्या वचननाम्यातील ९० टक्के वचने अपूर्ण असताना आणखी पाच वर्षे हेच हवे आहेत का, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. ‘मन बदला मुंबई बदलेल’ या घोषवाक्याने काँग्रेसने प्रचार मोहिमांना जोरदार सुरुवात केली आहे.

सेनेच्या वचननाम्याची चिरफाड

शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्याची चिरफाडही संजय निरुपम यांनी केली. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई व पिंजाळ ही धरणे पूर्ण करण्याचे आश्वासन होते. मात्र त्यांचा सुसाध्यता अहवालही अजून तयार झालेला नाही. गेल्या पाच वर्षांत १४ उड्डाणपूल बांधले जातील, असे सांगण्यात आले प्रत्यक्षात एकही उड्डाणपूल उभा राहिलेला नाही. मुलुंड, गोराई, कांजुरमार्ग येथील कचराभूमीवर विद्युतप्रकल्प उभे राहिले नाहीत, मुंबई धूळमुक्त झाली नाही, ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाचे काम ४० टक्केच पूर्ण झालेय, दहिसर-ओशिवरा-पोईसर नद्यांचे सुशोभीकरण केलेले नाही, फेरीवाल्यांसाठी विशेष भाग, महिलांसाठी आरोग्य केंद्र, क्रिकेट अकादमी, अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण, मराठी साहित्यभवन, बेस्ट आगारांचे नूतनीकरण या सर्व घोषणा हवेतच राहिल्या आहेत, असे ते म्हणाले.