आता छुप्या प्रचारावर भर ; मतदारांना खूश करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

‘पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही’ इथपासून ‘औकात काय’  ते ‘यांनी मुंबईचा पार बट्टय़ाबोळ केला’ अशा विधानांचे गेले १५ दिवस दळण दळले गेल्यावर येत्या मंगळावारी होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता प्रचाराचा अखेरचा दिवस रविवार, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी प्रचारफेऱ्या, घरोघरी संपर्क किंवा मिरवणुका काढून सार्थकी लावला. उमेदवार उदार झाल्याने मुंबई-ठाण्यात काही ठिकाणी घरांमध्ये चुली पेटल्याच नाहीत. जास्तीत जास्त मतदार बाहेर कसे पडतील, याचे नियोजन आता उमेदवारांकडून सुरू झाले होते.

मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत जास्त मतदान होत नाही, असा अनुभव आहे. गेल्या वेळी जेमतेम ४५ टक्के मतदान झाले होते. यामुळेच आपले हक्काचे मतदार बाहेर कसे पडतील याची चाचपणी उमेदवारांकडून सुरू झाली. अखेरच्या टप्प्यात प्रचाराला जान आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक चांगलीच गाजली. राज ठाकरे यांनीही पैसे की कामाला मत देणार, असे भावनिक आवाहन केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत संभ्रम निर्माण केला. शिवसेनेने बाहेर पडावे, असा सल्ला दिला. भाजप आणि शिवसेनेतील वादात काँग्रेसचा प्रचार तसा फिका पडला. पण मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला.

  • प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वत्रच मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला.
  • मुंबई, ठाणे, पुणे साऱ्याच शहरांमध्ये उमेदवारांच्या पदयात्रा, मिरवणुका निघाल्या होत्या.
  • परिणामी ठिकाठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रचाराचा शेवटचा दिवस रविवारीच आल्याने अनेक ठिकाणी भोजनावळीही उठल्या.
  • ठाण्यात तर एका ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांना बिर्याणीचे आवतण दिले होते.
  • मतदारराजा खूश होईल अशा पद्धतीने सारे काही सुरू होते.
  • सारे आता शांत झाले असले तरी २१ तारखेच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी ‘प्रोत्साहन’ देण्यासाठी आता उमेदवार अनेक ‘क्लृप्त्या’ लढवतील अशी चर्चा आहे.
  • रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवार तसेच राजकीय कार्यकर्ते सावध झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निवडणूक यंत्रणा तसेच पोलीस दक्ष झाले आहेत.

 

भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारकांकडून पैसेवाटप?

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मकरंद नार्वेकर यांच्या प्रभागात भाजपची पत्रके वाटणाऱ्यांकडून पैसेवाटप होत असल्याची ध्वनिचित्रफीत शनिवारी रात्री समाजमाध्यमांवर पसरली. या प्रकरणी निवडणूक भरारी पथकाने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पालिकेच्या २०१२ मधील निवडणुकांमध्ये कुलाबा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मकरंद नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते २१७ प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पत्नी हर्षदा या २१६ प्रभागातून रिंगणात आहेत. शनिवारी रात्री २१७ क्रमांकाच्या प्रभागात भाजपची पत्रके वाटणाऱ्या कार्यकर्त्यांजवळ दोन हजारांच्या नोटांची बंडले असल्याची ध्वनिचित्रफीत सर्वत्र पसरली. ध्वनिचित्रफितीत काही जण भाजपची पत्रके वाटताना आढळत आहेत आणि त्यांच्याजवळ पैसेही दिसत आहेत, मात्र पैसेवाटप करीत असल्याचे दिसत नाही, असे भरारी पथकाने केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

माझी बदनामी करण्याचा व मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. अनोळखी इसमांविरोधात ही तक्रार करण्यात आली असून त्यांचा माझ्याशी नाहक संबंध जोडला गेला आहे.

 – मकरंद नार्वेकर, भाजप