भाजप-शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजपने ११४ जागांच्या मागणीकडे शिवसेनेने दुर्लक्ष करत त्यांच्यासमोर ६० जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ थांबले असले तरी भाजप अजूनही शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्तावाची वाट पाहत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. आम्ही कुठलीही डेडलाइन दिलेली नाही. बदललेल्या परिस्थितीनुसारच आम्ही जागा मागितल्या आहेत. त्यामुळे युती झाली तर ठिक अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राजकारणात कोणी कोणाची वाट पाहत नाही. वाट पाहत बसलो तर फसवेगिरीचा प्रकार होतो, असा सूचक इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला.

रावसाहेब दानवेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, युतीच्या चर्चेत कुठलाही अडसर येऊ नये. त्यामुळे आम्ही डेडलाइनही दिलेली नाही. दोन्ही पक्षांच्या सोयीने युतीची चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आता आम्ही फक्त शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्ताव येण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले. मागील निवडणुकीच्या तुलनेत मुंबईत परिस्थितीत बदलली आहे. आमच्या आमदारांची संख्या वाढली असल्यामुळे आम्ही ११४ जागांचा प्रस्ताव सेनेसमोर ठेवला आहे. युती झाली तर ठिक अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

आम्ही ११४ जागांच्या प्रस्तावाशिवाय इतर कुठला नवा प्रस्ताव दिला नसल्याचे सांगत वृत्त वाहिन्यांवरच ८०-९० जागांच्या प्रस्तावविषयी बोलले जात असल्याचे ते म्हणाले.
राज्यात इतर ठिकाणी युतीचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये कुठल्याही गुंडांना प्रवेश दिला नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. जे गुंड असतील त्यांना पदेही दिली जाणार नाही व उमेदवारीही देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर फोटो काढण्यासाठी अनेकजण येतात. त्यावेळी ती व्यक्ती गुंड आहे की आणखी कोण हे कळत नाही. लगेच ते आमच्या पक्षात असल्याचे किंवा आमचे त्यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले जाते असे ते, भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

तत्पूर्वी, सोमवारी दुपारी शिवसेनेने आपला स्वतंत्र वचननामा प्रकाशित केला. भाजपबरोबर युती झाल्यास त्यांच्याही मुद्द्यांचा समावेश केला जाईल असे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या वेळी त्यांनी खासदार किरीट सोमय्यांचे नाव न घेता त्यांनाही चिमटे काढले.