युतीमुळेच सेनेला त्या ‘४०’ जागा – शेलार

मुंबई महापालिकेतील युतीसाठी विधानसभेच्या निकालानुसारच जागावाटप करण्याची भूमिका भाजपने घेतली असून, भाजपची सरशी झालेल्या ११४ प्रभागांची यादी शिवसेनेला पाठविण्यात आली. या जागांवर शिवसेनेचे ४० नगरसेवक निवडून आले असून ते भाजपशी युतीमुळेच निवडून आले होते, असे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. भाजपने मुंबईत २५ लाख सदस्य नोंदणी केली असून पक्षाची ताकद वाढली असल्याचे पुरावे आम्ही आकडेवारीनुसार शिवसेनेला देऊ शकतो, असे शेलार यांनी स्पष्ट केले. मात्र विद्यमान नगरसेवकांच्या जागा भाजपला कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

शिवसेना-भाजप युतीसंदर्भात गुरुवारी चर्चा झाली नाही. भाजपने विधानसभेचा निकाल गृहीत धरून ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे, त्या जागांची मागणी शिवसेनेकडे केली. आता २०१२ च्या महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबलापेक्षा विधानसभा निवडणुकीतील निकालानुसारच जागावाटप करण्याचा भाजपचा आग्रह आहे. भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही ११४ जागांची यादी शिवसेनेकडे पाठविली, त्यापैकी ४० जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले असल्याने जागावाटपाचा तिढा आहे.

दरम्यान, भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू ठेवली असून मुंबई विभागातील संसदीय मंडळाची बैठक भाजप कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यात सुमारे ६५ ते ७० प्रभागांमधील उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हा समित्यांकडून २२७२ इच्छुक उमेदवारांची यादी आली होती. त्याची छाननी करून १९७२ उमेदवारांच्या नावांवर विचार करण्यात येत आहे.