मुंबईकरांचा ‘मत’उत्साह यंदा तरी वाढणार?

आपल्या मताचा अधिकार मोकळेपणाने कोणाचीही भीडभाड न ठेवता स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च होणार असून शहरातील ९० लाख मतदाते गृहीत धरता मुंबईकरांच्या एका मताची ‘किंमत’ तब्बल १०६ रुपये असणार आहे. अर्थात इतका खर्च करूनही मुंबईकरांच्या निरुत्साहामुळे गेल्या २५ वर्षांत एकदाही मतदानाचा टक्का ५०च्या पुढे जाऊ शकलेला नाही. या वेळच्या निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहिली तर मतदानावर होणारा अध्र्याहून अधिक खर्च वायाच जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार गरीब वस्तींमध्ये जास्त तर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कमी प्रमाणात मतदान होताना दिसते. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पालिकेकडून चांगल्या सोयी उपलब्ध असल्या तरी सर्वानाच प्रभागाबाहेर पडण्याची गरज लागतेच. शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी चांगला प्रतिनिधी नेमणे हे त्यामुळेच नागरिकांचे कर्तव्यही ठरते. ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेतील निर्णय कोण घेणार हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना आहे. त्यातच सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र लढत असल्याने काही मतांनीही फरक पडण्याची शक्यता आहे. तेव्हा तुमचे मत आवर्जून द्या.

मतदान करताना लक्षात ठेवा

* तुमच्या प्रभागातील उमेदवारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती – शिक्षण, संपत्ती, गुन्ह्य़ांची नोंद – यांचा तपशील वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही माहिती मतदान केंद्राजवळही लावण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवार निवडीचा निर्णय घेण्यास मदत होईल.

* जानेवारीत अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर मतदान करता येणार नाही.

* मतदार यादीत तुमचे नाव असेल तर मतदान केंद्राचे नाव व पत्ता यांची माहिती असलेल्या चिठ्ठय़ा तुमच्या घरापर्यंत पोहोचवल्या जातील. मात्र अशी माहिती आली नाही तर या मतदारयादीत नाव पाहण्यासाठी तसेच मतदान केंद्राची माहिती मिळवण्यासाठी तीन संकेतस्थळे तसेच निवडणूक आयोगाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे.

* महानगरपालिकेच्या http://www.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर किंवा https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in  इथे नाव पाहता येईल. खासगी संस्थेने तयार केलेल्या https://operationblackdot.in  या संकेतस्थळावरही नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून माहिती घेता येईल. निवडणूक आयोगाच्या True Voter या अ‍ॅप्सवरही ही माहिती उपलब्ध आहे. हे अ‍ॅप्लिकेशन जीपीएसवर आधारित असल्याने तुम्हाला घरापासून मतदान केंद्रापर्यंतचा मार्गही दिसू शकतो.

१५८२  ठिकाणे

७३०४ संवेदनशील क्षेत्र

७०५ संवेदनशील क्षेत्र

१७ अतिसंवेदनशील क्षेत्र